धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गजानन पार्क परिसरात छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. परंतू हा कारखाना मागील दोन वर्षापासून सुरु होता, अशी धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. विशेष म्हणजे या गोरखधंद्यात गावातील एक राजकारणी गुंतला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही बडे मासे अटकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण आणि कुणा-कुणाला केलीय अटक ?
या संदर्भात अधिक असे की, साई गजानन पार्कमधील भास्कर पांडुरंग मराठे याच्या राहत्या घरात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरु होता. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून १) गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव २) भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ३) कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव ४) भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव, अशा चार जणांना रंगेहाथ अटक केली.
कोण आहे बनावट मद्याचा मास्टर माइंड
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भुपेंद्र पाटील आणि गुजरातचा गौतम माळी हे दोन जण बनावट देशी दारूच्या कारखान्याचे मास्टर माइंड असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आज दुपारी सर्व चारही संशयित आरोपींना धरणगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, आधीही अटकेतील दोन संशयितांवर छोट्या-मोठ्या कारवाई झाल्याचे कळतेय.
मागील दोन वर्षापासून सुरु होता कारखाना !
धरणगाव शहर राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील आहे. तरी देखील या शहरात चक्क बनावट मद्याचा कारखाना मागील दोन वर्षापासून बिनबोभाट सुरु होता. आधी चोपडारोडवरील एका पाणी जारच्या नावाखाली हा कारखाना सुरु होता. काही महिन्यांपूर्वी एक तोडपानी झाल्यानंतरही हा कारखाना सुरुच होता. काही दिवसांपूर्वी हा कारखाना साई गजानन पार्कसारख्या गावापासून लांब आणि एकांतात असणाऱ्या भागात स्थलांतरित करण्यात आला होता. ज्याच्या घरात कारखाना सुरु होता, त्या व्यक्तीला घरभाडे म्हणून मोठी रक्कम देण्याचे आमिष देऊन हा गोरखधंदा सुरु करण्यात आला होता.
आणखी बडे मासे अटकण्याची शक्यता !
पालिकेच्या राजकारणात सक्रीय असलेला गावातील एक राजकीय व्यक्ती देखील बनावट देशी दारूचा कारखान्यात संलिग्न असल्याची चर्चा आहे. हा गुटख्याच्या तस्करीतही सहभागी असल्याचे कळते. दरम्यान, गुटखा किंवा बेकायदा दारू तस्करी सारख्या गुन्ह्यानंतर आता चक्क बनावट देशी दारूचा कारखाना गावात कुणाच्या आशीर्वादाने सुरु होता?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
धुळे-नंदुरबारसह शिरपूर परिसरात लागायची बनावट मद्याची विल्हेवाट !
बनावट देशी दारूचा कारखाना जरी धरणगावात सुरु होता. तरी गावातील वातावरण लक्षात घेता मद्य तस्कर त्यांनी बनवलेल्या मालाची विल्हेवाट धुळे-नंदुरबारसह शिरपूर परिसरात लावत असल्याची माहिती समोर येत आहे. गावात जर बनावट मद्य विकले तर देशी दुकानदार किंवा दोन नंबरवाले बोभाटा करून धंद्यात जम बसू देणार नाहीत म्हणून मद्य तस्कर बनवलेला सारा माल बाहेरच्या जिल्ह्यात विकत होते. असं केल्यामुळे त्यांचे दोन फायदे होत होते. एक तर गावात कुणाशी वैर व्हायचे नाहीत आणि दुसरं स्थानिक यंत्रणेच्या नजरेत येत नव्हते. बाहेर जिल्ह्यात माल दिल्यानंतर कुठेही पकडला गेला तरी माल कुठून आला? आणि कुणी दिला? हे कधीही समोर येत नव्हते.