धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीचे साथीदार जिल्हा व राज्याबाहेरचे आहेत. एवढेच नव्हे तर, गुन्हयाची व्याप्ती मोठी असून यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडालीय. तर दुसरीकडे चौघां संशयित आरोपींचे जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
चौघांचा जामीन अर्ज फेटाळला
अटकेतील आरोपींपैकी ‘मास्टर माइंड’ असलेल्या गौतम माळीला (वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव) आज पुन्हा तीन दिवसांची म्हणजे २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर उर्वरित भुपेंद्र गोकुळ पाटील (वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव), कडु राजाराम मराठे (वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव), भास्कर पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव) या तिघां आरोपींची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दरम्यान, वरील तिघां आरोपींसह सचिन मधुकर पाटील (वय ४२ वर्ष रा. भवानी मंदिराच्या मागे शाम कॉलनी पाळधी ता. धरणगाव) याने देखील जामीन अर्ज दाखल केला होता. परंतू न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
‘मास्टर माइंड’ गौतम बऱ्याच गुन्हयांमध्ये फरार, साथीदार इतर जिल्ह्यासह राज्याबाहेरचे !
आरोपी गौतम नरेंद्र माळी बनावट मद्य प्रकरणाचा मुख्यसुत्रधार असून तो यापूर्वीही बऱ्याच गुन्हयांमध्ये फरार आहे. उत्पादन शुल्क विभागाचे तपास करणारे पथक गौतमकडून अद्याप गुन्हयांची पूर्ण माहीती घेत असून त्यांच्याकडून अजून काही मुद्देमाल हस्तगत करायचा आहे. एवढेच नव्हे तर, गौतमचे साथीदार हे जिल्हा व राज्याबाहेरचे असल्याचे देखील तपासात समोर आले आहे.
गुन्हयाची व्याप्ती मोठी आंतरराज्यीय टोळीचा सहभाग
गौतमने गुन्ह्यात वापरलेले वाहने तसेच त्यास साहीत्य पुरवणारे यांचा तपास सुरु असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर, बनावट मद्याच्या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी असून आंतरराज्यीय टोळीचा यात समावेश असल्याचे तपास समोर आहे. दरम्यान, यानिमित्ताने बनावट दारू प्रकरण धरणगावपासून सुरु होत आता थेट गुजरातसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पोहचल्याचे दिसून येत आहे.
आणखी एक आरोपी वाढला ; मद्यार्कसह इतर साहित्य पुरवणाऱ्यांसह धुळ्याचा आरोपी फरार
अटकेतील आरोपींनी त्यांना मद्य तयार करण्यासाठी संजय रमण देवरे (रा. वावडदा ता. जळगाव) हा मदत करत असल्याचे सांगीतले होते. त्यानुसार संजय रमण देवरे याला आज ताब्यात घेण्यात आले होते. परंतू त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्याची कोव्हीड अँटीजेन टेस्ट पॉझीटीव्ह आली. त्यामुळे त्याला फो. प्र. संहीता १९७३ चे कलम ४१ नुसार नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, यानिमित्ताने आता आरोपींची एकूण संख्या आठवर पोहोचली आहे. तर यातील मद्यार्कसह इतर साहित्य पुरवणाऱ्यांसह धुळ्याचा आरोपी फरार आहे.