धुळे (वृत्तसंस्था) धुळे तालुक्यातील तरवाडे गावात धारदार शस्त्राने वार करून मायलेकींची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. धुळे तालुक्यातील तरवाडे या गावात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या चंद्रभागाबाई माळी (वय वर्षे ६५) आणि त्यांची मुलगी वंदना महाले (वय वर्षे ४५) यांचा पहाटेच्या दरम्यान धारदार शस्त्राने खून करण्यात आला. दोन्ही मायलेकींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळून आले.
धुळे तालुक्यातील तरवाडे या गावात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या चंद्रभागाबाई माळी वय (वर्ष 65) व त्यांची मुलगी वंदना महाले वय (वर्ष 45) यांचा पहाटेच्या दरम्यान रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर या गावामध्ये एकच खळबळ उडाली यासंदर्भात तालुका पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्याचबरोबर इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे.
मुलगी वंदना तिचे वैवाहिक वाद सुरू असल्यामुळे ती आईकडेच राहत होती, यादरम्यान अशा पद्धतीने या दोघा मायलेकींचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर या हत्येसंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. मृत झालेल्या दोनही मायलेकींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत असून या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सध्या सुरू आहे.