धुळे (प्रतिनिधी) येथील पंचायत समितीच्या कार्यालयात सोमवारी दुपारी साडेतीन हजारांची लाच घेताना एका लिपिकाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. शामकांत नानाभाऊ सोनवणे (वय ५२), असे संशयित आरोपी लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे पंचायत समितीत शाखा अभियंता या पदावर कार्यरत असून एप्रिल २०२२ पावेतो ते रतनपुरा बीट येथे नेमणुकीस होते. या कालावधीत बीटचे विभागीय लेखा परिक्षण झाले होते. या लेखा परिक्षणाच्या नावाने बक्षिस म्हणून कनिष्ठ सहायक शामकांत सोनवणे हे तक्रारदार यांच्याकडे मागील काही दिवसांपासून ३ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करत होते. तक्रारदार यांना पैसे द्यायचे नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी दुपारी सापळा लावण्यात आला. त्यानंतर साडेतीन हजारांची लाच घेताना श्यामकांत सोनवणे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या प्रकरणी देवपूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, कर्मचारी राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.