नाशिक (वृत्तसंस्था) पत्नीच्या भावाने आपल्या साथीदारांच्या मदतीने मेव्हण्यास बेदम मारहाण करीत निघृण हत्या केल्याची घटना ढकांबे (ता. दिंडोरी) येथे घडली. जखमी मेव्हण्यावर चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रेमप्रकरणाच्या संशयातून ही घटना घडल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. किरण रतन तांदळे (वय ३५ रा. आंबेवणी ता. दिंडोरी) असे मरण पावलेल्या मेव्हण्याचे नाव आहे.
सतीश वायकंडे हा किरण तांदळे यांच्या पत्नीचा भाऊ आहे. गेल्या मंगळवारी (दि. ८) रात्री सतीशने आपल्या मेव्हण्याशी संपर्क साधून त्यांना ढकांबे येथे बोलावून घेतले होते. या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संतप्त सतीशने आपल्या साथीदारांच्या मदतीने तांदळे यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर ते मृत झाल्याचे समजून त्यांना करंजी शिवारातील निर्जनस्थळी फेकून दिले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तांदळे जखमी आवस्थेत आढळून आल्याने वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारार्थ पत्नी योगिता तांदळे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे अतिदक्षता विभाागात उपचार सुरू असताना शनिवारी (दि. १२) दुपारच्या सुमारास तांदळे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही हत्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून झाल्याचे बोलले जात असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.