पुणे (वृत्तसंस्था) सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयाने आज पाच जणांवर आरोप निश्चित केले आहे. पाचपैकी चार आरोपींविरुद्ध युएपीए कायद्यानुसार खटला चालविण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
विरेंद्र तावडे (कटाचा सूत्रधार), सचिन अंदुरे (दाभोलकरांचा मारेकरी), शरद कळसकर (दाभोलकरांचा मारेकरी), विक्रम भावे (हत्येच्या कटात सहभाग) या चार आरोपींविरुद्ध युएपीए कायद्यानुसार कारवाई होणार आहे. तर या प्रकरणातील पाचवा आरोपी सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर याच्याविरुद्ध हत्येसाठी वापरलेली शस्त्रे नष्ट करण्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
सीबीआयतर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कामकाज पाहिले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात आरोपींवर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले होते. आरोपी अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करणे आदी आरोप ठेवण्यात आले होते. आज (बुधवार) झालेल्या सुनावणीत न्यायालयातर्फे दोषारोप निश्चित करण्यात आले आहे. पुढील सुनावणी ही ३० सप्टेंबरला होणार आहे.