जळगाव, (प्रतिनिधी) दि.31 जुलै 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान प्रशासनासाठी 150 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या जळगाव परिमंडलात नवीन वीज जोडणी, नावात बदल, पत्त्यात दुरुस्ती, वीजबिलाबाबत तक्रार निवारण आणि वीजपुरवठा खंडित तक्रार निवारण अशा प्रकारची विविध ग्राहकांची कामे गतीने पूर्ण करण्यात आली आहेत. गतिमान सेवेसोबत तक्रारींचे जलद निवारण करीत ही मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी तसेच विविध विभागातील कामांना चालना देण्यासाठी व कामे तळागळापर्यंत व अधिक लोकाभिमुख करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. महावितरणच्या कोकण प्रादेशिक परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, दि. 2 मे 2025 पासून सुरू झालेल्या या 150 दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमात महावितरणच्या जळगाव परिमंडलाने आजपर्यंत 9158 ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे. 3353 ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले आहेत. 335 ग्राहकांच्या पत्त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. तर 26440 ग्राहकांच्या वीजबिलाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. याशिवाय, वीजपुरवठा खंडित संदर्भातील 24575 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्सविषयक सुधारणा आणि सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित १५० दिवसांचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यानुसार महावितरण तक्रारींचे निवारण करण्याबरोबरच ग्राहकांना गतिमान सेवा देण्यासाठी कार्यरत आहे.