मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई ही देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. येथील महानगरपालिकेत एकही लोकप्रतिनिधी नसून गेल्या तीन वर्षांपासून १४ प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. तिकडे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तारखांवर तारखा देत आहेत आणि इकडे मुख्यमंत्री तारीख देत आहेत. हे सर्व संगनमताने सुरू आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात, अशा शब्दांत शिवसेनेचे (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. आगामी विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होईल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत यांनी हल्लाबोल केला.
भाजपच्या सांगण्यावरून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरतात. भाजप आणि त्यांच्यासोबत असणारे लोक हरणार आहेत म्हणून महाराष्ट्रातील १४ महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पाडल्या आहेत. हिंमत असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले. आपण काहीतरी करू शकू हा विश्वास निर्माण होईल तेव्हाच ते निवडणूक घेतील. लोकशाहीची स्थिती अशी बनलीय की निवडणुकाही त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, लोकसभेला महाराष्ट्रात काय झाले, तेच विधानसभेलाही होईल, असे सांगतानाच तुम्ही तारखा देत राहा. ज्या तारखेला निवडणूक होईल त्या तारखेला तुम्ही घरी बसाल, असा इशाराही राऊत यांनी दिला.