धरणगाव (प्रतिनिधी) शहरात दुपारपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महावितरणचा कार्यालयीन दूरध्वनी बंद असल्यामुळे खंडित वीज पुरवठ्याचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतू मेन लाईनवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वीज गेल्याबाबत अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. तर वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू करण्यात आले असून लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.