जळगाव (प्रतिनिधी) जीवनातील कोणत्याही बिकट प्रसंगांना न डगमगता, कोणतीही अगतिकता न पत्करता, आपल्या औद्योगिक दृष्टिकोनाचा वापर करून स्वतः उद्योगात उंच भरारी घेणारी, आपल्या कार्य कर्तृत्वावर केवळ खुश न राहता, रस्त्यावर उतरून दुःखीतांचे प्रश्न जाणून त्यांना सरळ हाताने मदत करणारी, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील कोल्हापूरची मर्दानी स्मिता जयंत लंगडे यांच्या जीवन प्रवासाचा वेध पल्लवी भोगे यांनी घेतला आहे.
व्यवसायाचे मुळ तर रक्तातचं होते. अगदी बालपणापासून गारमेंटच्या दुकानात बसणे, रॉकेलचा डेपो चालविणे अशी व्यावसायिक कामे स्मिता जबाबदारीने पार पाडायच्यात. आई विद्या महाडीक व वडील राजेंद्र महाडीक यांचे अगदी सक्त नियम होते. की, मुलीने सासरी आहे त्या परिस्थितीत राहायचे. तिने तिचा संसार सांभाळायचा कष्ट करून पैसा मिळवायचा. आयते काहीही मिळणार नाही. शिक्षण बी.कॉम, डिप्लोमा इन वेब डिझायनिंग,डिप्लोमा इन इंटेरीअर असून सुध्दा स्मितांनी स्वतः गरोदर असताना, घरोघरी जाऊन चहापावडर विकली. नंतर मग कोल्हापूरला वेबडिझायनर म्हणून जाॕब मिळवला. त्यांनी मुलाला आईजवळ ठेऊन अगदी दोन-दोन जाॕब केले. परंतु काही दिवसातच स्मितांच्या लक्षात आले की जॉबमध्ये फारसी प्रगती नाही. “हिम्मते मर्दा तो मददे खुदा” म्हणीप्रमाणे स्मिता यांनी उद्योग भवनचे साडेतीन लाखांचे कर्ज काढले व मशीन मॕन्युफॕक्चरिंग व मार्केटींगचा व्यवसाय सुरू केला.व त्यात त्यांना यश प्राप्त झाले. गेल्या १५ वर्षापासून स्मिता हाच व्यवसाय करीत असून आजवर त्यांनी संपूर्ण देशातील १५००० महिलांना रोजगार मिळवून दिलेला आहे.
स्मिता सत्यर्थ एन्टर प्राईजेसच्या संस्थापक संचालक असून पेन, पेन्सिल व वाती बनविण्याचे मशीन यांची विक्री करून,तयार मालाचे मार्केटींग स्मिता “सत्यर्थ एन्टरप्राईजेस” माध्यमातून करतात. मासिक तीन हजार रूपये कमावणारी सर्वसाधारण महिला, आज महिना चार लाख कमावत असून एक यशस्वी उद्योजक आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब म्हटली पाहिजे. उद्योगासोबतच स्मिता यांच्या सामाजिक कार्याचा आवाखा फार मोठा आहे.उसतोड मजूर काय,वारांगणा काय, घरगुती काम करणाऱ्या मोलकरणी काय,अनाथ,अपंग,एच.आय.व्ही बाधीत बालक यांच्या अन्न,वस्ञ आणि निवारा संबंधित गरजांकरिता किमान ६०० कुटुंबांना या पूर्वीप्रमाणेच,कोरोना काळात विशेष मदत केल्याने स्मिता यांना दहा ते बारा कोरोना योध्दा,कोरोना वाॕरियर,कोरोना फायटर यासारखे सन्मान प्राप्त झाले आहेत. यावर्षी नवराञी सुमारास दैनिक पुढारी आयोजित “मी कस्तुरी, मी दुर्गा” या सदरात त्यांचे लाईव प्रसारण घेण्यात आले. दिपस्तंभ,आदर्श उद्योजिका गौरव पुरस्कार, स्वयंदिप,एक्सिलेंट लिडरशीप पुरस्कार, महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार ,राष्ट्रीय एकात्मता आयकाॕन पुरस्कार, युनिवर्सल टॕलेंट बुक आॕफ रेकार्डमध्ये नोंद आजवर स्मिता यांनी जिल्हा,राज्य,देश व परदेश स्तरावरचे ६० पुरस्कार प्राप्त केले असून सामाजिक कार्यात त्यांनी आपला अमिट असा ठसा निर्माण केला आहे.
स्मिता आत्यंतिक महत्त्वाकांक्षी असल्याने इथवरच न थांबता, स्मिता जयंत लंगडे एक यशस्वी उद्योजिका यांचे संपूर्ण देशात शंभर मॉल सुरू करण्याचे स्वप्न आहे. संघर्षातील यशस्विनी स्मिता लंगडे यांच्या भावीवाटचालीस शुभेच्छा !