जळगाव प्रतिनिधी – शहराला कधी काळी पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा पंपींग प्लांटवरून येणारी जुनी पाईपलाइन जेसीबीद्वारे चारी खोदून चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनपा अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अजून काही मोठे चेहरे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उडाली प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग उपअभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२ रोजी ते उमाळे येथील फिल्टर प्लॉन्टचे कामकाज पाहण्यासाठी गेलो असता त्यांना कॉण्ट्रक्टर सुमीत सोनवणे यांनी फोन केला. गिरणा पंपींग जवळ आर्यन पार्कच्या समोर असलेली जुनी पाण्याची लोखंडी पाईप लाईन कोणीतरी जेसीबी वाहनाच्या साह्याय्याने चारी खोदुन काढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोरोले यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले.
जेसीबीच्या साहाय्याने चोरी करताना पकडले !
सायंकाळी ६.३० वाजेचे सुमारास योगेश बोरोले हे शामकांत भांडारकर (इंजीनिअर), विशाल सुर्वे, दिपक चौधरी यांच्यासह त्याठिकाणी पोहचले. त्यावेळी एक पिवळ्या रंगाचे जेसीबीवरील दोन इसम हे जेसीबीच्या साह्याय्याने जुन्या पाईप लाईन मधील बीडचे पाईप काढताना मिळुन आले. जेसीबी चालक नरेंद्र निवृत्ती पाणगडे, व रवण चव्हाण अशी त्यांची नावे समोर आली.
एकाने काढला पळ, तिघांची सांगितली नावे !
अधिकाऱ्यांनी दोघांना जेसीबीच्या खाली उतरण्यास सांगितले असता रवण चव्हाण हा लक्ष विचलीत करुन तेथून पळून गेला. नरेंद्र पाणगडे याचेकडे चौकशी करीत असताना अक्षय अग्रवाल हा देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला. नरेंद्र पाणगडे यास सदरची पाईप लाईन कोणी खोदावयास सांगितली? अशी विचारणा केली असता त्याने अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांचे सांगण्यावरुन खोदली असुन सदर जेसीबी आणण्याबाबत अक्षय अग्रवाल याने मला सांगितल्याने मी सदर जेसीबी आणुन त्याव्दारे पाईप लाईन खोदुन त्यातुन जुने पाईप काढत असल्याचे सांगितले.
जेसीबी, पाईप जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा !
अधिकाऱ्यांनी अक्षय अग्रवाल याचेकडे चौकशी केली असता त्यानेच सदर जेसीबी वाहन सदर ठिकाणी पाठविल्याचे सांगितले. यावरून महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता योगेश बोरुडे यांच्या फिर्यादीवरून अक्षय अग्रवाल, नरेंद्र पानगडे, रवण चव्हाण, भावेश पाटील, अमीन राठोड आणि सुनील महाजन या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील महाजन हे जळगाव शहर विधानसभा लढविणाऱ्या ठाकरे गटाच्या उमेदवार तथा माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून याआधी देखील अशाच प्रकारे पाईप चोरी झाल्याचा एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे याप्रकरणाची पाळेमुळे दूरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठेका नसतानाही काढली पाईप लाईन !
दरम्यान, चौकशीत पाईप लाईन काढण्याबाबत कोणताही ठेका दिलेला नसल्याचे देखील चौकशीत समोर आले आहे. सुरूवातीला अक्षय मनोज अग्रवाल भावेश भानुदास पाटील, अमिन सलीम राठोड नरेंद्र निवृत्ती पाणगडे (30, रा.शिरसोली) या चार जणांविरोधात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर रोहन किशोर चौधरी आणि सुनील सुपडू महाजन यांची नावे वाढवण्यात आली. दरम्यान, सुनील महाजन यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
मनपाचे माजी विरोधी पक्षनेते महाजन यांच्या घरी दोन वेळा धडकले पोलिस
या गुन्ह्यात मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन हे संशयित आरोपी आहेत. शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक महाजन यांच्या घरी गेले होते; परंतु ते घरी मिळून आले नाहीत. दुपारी १ वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, विजयसिंग पाटील, अक्रम शेख, अतुल वंजारी यांचे पथक महाजन यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते; परंतु ते आढळले नाही. दुपारी ३ वाजता पुन्हा एकदा पोलिस खासगी वाहनाने त्यांच्या घराकडे गेले होते. तेव्हाही ते त्यांच्या घरी मिळून आले नाही. तर पोलिस अधिकाऱ्यांनी तपास करूनच न्यायालयात सुनील वामन महाजन नावाच्या व्यक्तीची माहिती दिली आहे. त्या नावाशी माझा काहीही संबंध नाही. गैरसमजातून घरी पोलिसांनी विचारणा केल्याचे सुनील महाजन यांचे म्हणणे आहे
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारी व सध्या बंद अवस्थेत असलेली इंग्रज कालीन पाईपलाईन चोरून नेण्याचा प्रयत्न केला. साधारण तीन-चार किलोमीटरची पाईप लाईन होती, साधारण तिची किंमत पाच लाखांची होती.
योगेश बोरोले
(उप अभियंता पाणीपुरवठा विभाग, जळगाव महापालिका)
यासंदर्भात पालिकेच्या उपभियंतांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. कोर्टात हजर केल्यावर त्यांना जामीन मिळाला आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस पुढील तपास करीत आहे. साक्षीदारांचा जबाब, तांत्रिक विश्लेषण आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे आरोपींमध्ये आणखी काही नावे वाढवली आहेत.
संदीप गावित
(उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव)