पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील वडगाव शेरी येथील एका शाळेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीवर (student) एका माथेफिरू तरुणाने वर्गात घुसून चाकूने (knife) सपासप वार केले आहेत. यात इयत्ता दहावीमध्ये शिकणारी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला.
इयत्ता दहावीत शिकणारी ही मुलगी असून आज शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ होता, या निमित्ताने ती आज शाळेत आली होती. यावेळी मुलीवर एकतर्फी प्रेम करणारा मुलगा थेट वर्गात शिरला आणि त्याने मुलीवर हल्ला केला. याआधीही या मुलाने अनेकवेळा त्या मुलीला त्रास दिल्याची माहिती पुढे आली आहे. मुलीवर सिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. याप्रकरणी शास्त्रीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.