जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूरमध्ये (Jaipur)एकाच कुटुंबातील पाच जणांची (Five members) हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जयपूरच्या दुडू शहरात तीन महिला आणि दोन मुलांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी या पाचही जणांचे मृतदेह विहिर फेकले. मृत्युमुखी पडलेल्या तीनपैकी दोन महिला गर्भवती होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, सासरच्या लोकांनी हुंड्याच्या लालसेपोटी कालुदेवी नावाची महिला, तिची दोन मुलं आणि दोन बहिणींची हत्या केली. कालू देवी हिच्या चार वर्षांच्या आणि 27 दिवसांच्या मुलांनाही मारेकऱ्यांनी सोडलं नाही. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका विहिरीत या पाचही जणांचे मृतदेह सापडले. धक्कादायक म्हणजे कालुदेवी हिच्या दोनही बहिणी गर्भवती होत्या.
वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बुधवार संध्याकाळपासून सख्ख्या बहिणींसह त्यांची दोन मुलेही बेपत्ता होती. पंधरा दिवसांपूर्वी कालुदेवी हिला सासरच्या लोकांनी मारहाण केली होती. यानंतर तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. सासरच्यांकडून हुंड्यासाठी तिचा छळ केला जात होता अशी तक्रार आहे. मोठ्या बहिणीला मारहाण करून तिच्या डोळ्याला दुखापत झाली होती. ती काही वेळापूर्वी रुग्णालयातून परतली होती आणि सासरच्यांकडून सतत हुंड्याची मागणी होत होती.