
जळगाव (प्रतिनिधी) – कुटुंबातील सदस्य दर्शनासाठी घराच्या दरवाजाला कुलुप लावुन उज्जेन (मध्यप्रदेश) येथे गेले. त्यानंतर चोरट्यानी या बंद घराला लक्ष करत दरवाजाचा कोयंडा कुलुप तोडत घरात एन्ट्री केली. कपाटातील सामान अस्तव्यस्त करत सोन्याचे दागिने तसेच रोकड असा सुमारे आठ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी चोरुन नेला. मेहरुण रामेश्वर कॉलनी महाजन नगर येथे ही धाडसी घरफोडी शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
संगिता राजू घुगे (वय ४२, रा. प्लॉट नं.१७, रामेश्वर कॉलनी, महाजन नगर) या पती राजू यशवंत घुगे, मुलगा सौरभयांच्यासह वास्तव्यास आहेत. ते शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रक्षाबंधन असल्याने त्यांची मुलगी श्रध्दा ही गुरुवारी सकाळी आई वडिलांकडे आली आहे. तिचे काही सोन्याचे दागिने कपाटात ठेवले होते. संगिता घुगे यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्यासह मुलगी श्रध्दा, मुलगा सौरव, आई विमल पाटील तसेच त्यांच्या भावाच्या दोन लहान मुली असे सर्व जण त्यांची मुलगी श्रध्दा हिच्या कारने घराच्या मुख्य दरवाज्याला कुलुप लावुन उज्जेन येथे दर्शनासाठी रवाना झाले. वाहन चालक त्यांच्या परिचयातील गजानन तिरमल (रा. जगवाणी नगर, जळगाव) हा होता.
देवदर्शनाहून आले आणि चोरीचा उलगडा
दुपारी एक वाजता घुगे परिवारातील सदस्य उज्जेन येथे पोहोचले. त्यानंतर देव दर्शन घेत ते परतीच्या प्रवासाला निघाले. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ते जळगाव येथे महाजननगरातील घरी आले असता त्यांना दरवाज्याचे कुलुप तसेच कडीकोंडा तुटलेला दिसला. घरात जावुन पाहिले असता बेडरुममध्ये असलेले लाकडी कपाटे उघडे दिसले. त्यातील सामान अस्थव्यस्थ खाली पडलेला दिसला. लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेल्याचे दिसले. घुगे परिवाराने तात्काळ माहिती पोलिसांना दिली.
१४ तोडे साने लंपास
सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे एक गठ्ठण, १४ तोडे (१४० ग्रॅम) वजनाचे दागिने, दीड लाखाची रोकड असा सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला.
पथकाकडून घराची पहाणी
घटनास्थळी पोलिसांचे श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञ दाखल झाले आणि त्यांनी तपासाच्या अनुषंगाने गती दिली. चोरट्यांनी स्पर्श केलेल्या ठिकाणचे फिंगर प्रिंट घेतले. श्वानने घटनास्थळावरुन तपास सुरू केला. घराबाहेरील रस्त्यापर्यंत तो आला. त्यानंतर तो पुन्हा माघारी फिरला. रस्त्यावरुन वाहनात बसुन चोरटे पसार झाले असावेत, असा पोलिसांकडून अनुमान लावण्यात येत आहे. एमआयडीसी पोलीस तसेच एलसीबीचे पथकानेही चोरी झालेल्या घराची बारकाईने पाहणी केली.
पोलिस अधिक्षक ‘स्पॉटवर’
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे आज सकाळी घटनास्थळ आले. त्यांनी चोरी झालेल्या घरातील बेडरुमसह घराची पाहणी केली. चोरट्यांनी अस्तव्यस्त केलेल्या सामानावर नजर फिरविली. तसेच विचारपूस केली तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पोलिसांनी हे फुटेज मिळविले. ते तपासले असता रात्री दीड वाजेनंतर एक अज्ञात संशयित रस्त्याने पायी चालत घराकडे जात असल्याचे दिसले. संगिता घुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्राप्त फुटेज तसेच तांत्रिकबाबींनुसार प्राप्त माहितीच्या आधारे तपासाचे चक्र गतीमान गेले आहे.
















