देहरादून (वृत्तसंस्था) उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एक बस 500 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस वऱ्हाडींना घेऊन हरिद्वारमधील लालढांग येथून काडागावकडे जात होती.
पौरी गढवाल जिल्ह्यातील बीरोखाल भागात रात्री 8 वाजता हा अपघात झाला. सिमडी गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत पडली. रात्र झाल्यामुळे बचाव कार्यात अडचण आली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. अंधारामुळे मोबाईल टॉर्चने मृतदेह आणि जखमींचा शोध घेण्यात आला. बसमध्ये सुमारे 50 लोक होते. पोलीस आणि एसडीआरएफ (राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) पथकाने 21 जणांची सुटका केली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री एकच्या सुमारास उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, ‘9 जणांची सुटका करण्यात आली आहे. 6 जखमींना बिरोखाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी कोटद्वार येथे रेफर करण्यात आले आहे.