
जळगाव (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून नफा देण्याचे अमिष दाखवत अॅड. तोषिता ज्ञानेश्वर भिरूड (वय ५३, रा. रामदास कॉलनी) यांची त्यांच्या गावातील ओळखीच्यांनी ७लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. हा प्रकार दि. ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अतुल भास्कर पाटील, त्याची पत्नी जयश्री अतुल पाटील (दोन्ही रा. बांभोरी, ता. धरणगाव), आई सुरेखा भास्कर पाटील उर्फ प्रीती दिलीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रामदास कॉलनी राहणाऱ्या अॅड. तोषीता भिरुड या वकील आहे. त्यांच्या परिचयातील प्रीती पाटील यांनी त्यांचा मुलगा अतुल पाटील व सून जयश्री पाटील हे एकाच गावातील असल्याने ते एकमेकांना ओळखतात. प्रिती पाटील या जानेवारी २०२५ मध्ये तोषीता भिरुड यांच्या घरी आल्या होत्या. त्यांनी त्यांचा मुलगा अतुल व सून जयश्री हे दोघ शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणून पैसे कमवित असल्याचे सांगितले. तसेच ते शेअर मार्केटमधून अनेकांना फायदा करून देत असल्याचे सांगितले. तसेच अतुल व जयश्री या दोघांनीही माहिती दिली. त्यानुसार तोषिता भिरूड यांनी दि. ३० एप्रिल रोजी अतुल पाटील यांच्या खात्यावर गुंतवणुकीसाठी १ लाख ५० हजार रुपये पाठविले. त्यावर त्यांना काही दिवस परतावा देखील दिला होता.
नियमीत परताव्यासाठी दिला लेखी करार
विश्वास निर्माण झाल्याने अॅड. भिरुड यांचा मुलगा आशिष याने देखील पुन्हा २ लाख, त्यानंतर दोन वेळा ५० हजार अशी एकूण ३ लाख रुपये यासह वेळोवेळी भिरुड रुड कुटुंबियांनी कुटुंबियांनी गुंतवणुकीसाठी त्यांना पैसे दिले होते. तसेच नियमित परताव्याची हमी असणारा लेखी करार देखील त्यांनी करुन दिला होता.
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची दिली धमकी
परतावा मिळत नसल्याने तसेच दोघांच्या नावाचा रितसर करार करुन देण्यास संशयितांकडून टाळाटाळ केली जात होती. तसेच त्यांनी दिलेले धनादेश देखील बाऊन्स झाले आहे. पैशाचा तगादा लावल्याने त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देखील देण्यात आली होती.
स्वतःच्या फायद्यासाठी वापरली रक्कम
गुंतवणुक केलेली ७ लाख रुपयांची रक्कम परत न करता स्वतःच्या फायद्याकरीता वापरुन फसवणुक केल्याप्रकरणी अॅड. तोषीता भिरुड यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अतुल भास्कर पाटील, त्याची पत्नी जयश्री अतुल पाटील (दोन्ही रा. बांभोरी, ता. धरणगाव), आई सुरेखा भास्कर पाटील उर्फ प्रीती दिलीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















