धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामाबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शिर्डी येथे जानेवारी महिन्यात शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलताना वादग्रस्त विधान केले होते. “राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
दरम्यान, आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य बेताल, बुद्धिहीन, अज्ञानीपणाचे आहे. त्यामुळे बहुसंख्य हिंदू लोकांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. भगवान श्री प्रभू राम हे भारतातील करोडो लोकांचे आराध्य दैवत आहेत. भगवान श्री प्रभू राम हे त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच अयोध्येतील अति भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी जाणूनबुजून केलेले वक्तव्य हे निश्चितपणे करोडो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हेतुपुरस्करपणे व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखाव्यात याच उद्देशाने केलेले आहे.
याबाबत धरणगाव पोलिस आणि जळगाव पोलीस अधीक्षकांकडे रीतसर तक्रारी अर्ज दिला होता. परंतू पोलिसांनी सदर अर्जावर कुठलीही कारवाई केली नाही किंवा कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आपण धरणगाव न्यायालयात १५६/३, २९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली असल्याचे अॅड. संजय महाजन यांनी सांगितले. दरम्यान, अॅड. संजय महाजन यांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली असून पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.