मुंबई प्रतिनिधी । राज्यात महामार्ग तसेच विविध रस्त्यांवर घडणाऱ्या अपघातानंतर उपचार न मिळाल्याने शेकडो जण मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मजुंरी मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला आहे. राज्यातील तत्कालीन शिवसेना -भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना आहे. तब्बल चार वर्षांनी अखेर या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
रस्ते अपघातातील जखमींचा जीव वाचवा यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यात 74 वेगवेगळ्या अपघाताचा समावेश करण्यात येईल. या योजनेसाठी 125 कोटी खर्च अपेक्षित असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
रुग्णांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून वा खासगी रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले जाईल.
-रुग्णालयात (कॅशलेस हॉस्पिटलायझेशन) तात्काळ दाखल करण्याची सोय.
-अपघातातील रुग्णावर तीन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचार.
-रुग्णाला घरी वा अन्य रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोहोचविण्याची जबाबदारी.
-यासाठी एक हजार रुपयांपर्यंत रुग्णवाहिकेचा खर्चही सरकार करेल.
-30 हजार रुपयांच्या विमा संरक्षणांतर्गत जखमीला रुग्णालयात दाखल करणे, नर्सिग, शस्त्रक्रिया, वैद्यकीय सल्ल्याचा खर्च तसेच रक्त व ऑक्सिजन पुरवठय़ाचा खर्च.
-योजनेच्या लाभासाठी वयाची अट नाही.