जळगाव (प्रतिनिधी) : एकाच कंपनीत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांमधील वादाने एकाचा मृत्यू घेतला आहे. जुन्या भांडणाची मनात खुन्नस धरून, एका फायनान्स कर्मचाऱ्याला बहाण्याने बोलावून त्याचा गळा आवळून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. निलेश राजेंद्र कासार (वय ३०, रा. जामनेर) असे मृताचे नाव असून, त्याचा मृतदेह शिरसोली जवळील नेव्हरे धरणातून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी निलेशच्या दोन मित्रांना अटक केली आहे.
मयत निलेश कासार हा जळगाव येथील ‘एल अॅण्ड टी फायनान्स’ कंपनीत कार्यरत होता. याच कंपनीत काम करणारा दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ता. एरंडोल) आणि पूर्वी याच ठिकाणी काम केलेला भूषण बाळू पाटील (वय २०, रा. पिंप्री) यांच्याशी निलेशची मैत्री होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी निलेश आणि भूषण यांच्यात किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते, अशी माहिती पोलीसांसह नातेवाईकांनी दिली आहे. धरणातून मृतदेह बाहेर काढला. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार नेव्हरे धरणात शोध घेतला असता, पोत्यात बांधलेल्या अवस्थेत निलेशचा मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. पोलिस ताफा घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या निघृण खुनामुळे जामनेर आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.
असा लागला गुन्ह्याचा छडा
निलेश बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी या प्रकरणी जळगाव पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. त्याचा शोध सुरू असताना निलेशची दुचाकी रामदेववाडी परिसरात बेवारस स्थितीत आढळली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. निलेशच्या कॉल डिटेल्स काढण्यात आले, यातून त्याच्या मित्र परिवाराचा शोध घेतला असता संशयित दिनेश चौधरी आणि भूषण पाटील यांना चौकशीसाठी बोलावले. चौकशी दरम्यान पोलीसांचा त्यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली.
कामाच्या बहाण्याने बोलावले अन् काढला काटा
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भूषणने एका फायनान्स प्रकरणाच्या मंजुरीवर चर्चा करण्याच्या बहाण्याने निलेशला शिरसोली येथे बोलावले. सोमवार, १५ डिसेंबर रोजी निलेश तेथे गेला असता, त्यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संशयित आरोपी भूषण पाटील व दिनेश चौधरी यांनी दोरीने निलेशचा गळा आवळून त्याची जीवनयात्रा संपवली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह पोत्यात भरून नेव्हरे धरणाच्या पाण्यात फेकून दिला.
















