तुळजापूर (वृत्तसंस्था) मारहाण केल्याच्या रागातून पतीस जबर मारहाण व कारने धड़क देऊन खून केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील कसई पाटी येथे बुधवारी (दि.१७) सायंकाळी घडली. याप्रकरणी मृताच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून मृताची पत्नी, मेहुणा व अन्य ३ अज्ञात व्यक्तीविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कसई येथील वनिता सिद्धेश्वर म्हमाणे यांचा भाऊ बसवेश्वर भीमाशंकर जळकोटे हा सोलापूर येथे कांदा मार्केटमध्ये हमालीचे काम करीत होता. तर त्याची पत्नी अश्विनी जळकोटे ही कंचेश्वर मंगरूळ येथे खासगी कॅन्टीनमध्ये मजुरीच्या कामासाठी होती. ती इटकळ येथे राहत होती. तेथून ती कामासाठी कंचेश्वर कारखाना येथे ये जा करीत होती. तिला एक मुलगा व एक मुलगी आहेत.
पत्नी अश्विनीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने बसवेश्वरचे तिच्याशी नेहमी वाद होत असत. बुधवारी (दि.१७) सायंकाळी अश्विनी मुलांसह कसई येथे आली होती. काही वेळाने अश्विनी परत निघाली. त्यासाठी वनिता व त्यांचा मुलगा ओंकार पिकअप गाडीतून अश्विनी व तिच्या मुलांना घेऊन कसई पाटी येथे आले.
यावेळी कारमधून अश्विनीचा भाऊ सागर सुभाष धबडे व त्याचे अन्य ३ साथीदार बसवेश्वरला घेऊन आले होते. सागर व त्याचे साथीदार गाडीतून खाली उतरले. तुझा भाऊ माझ्या बहिणीस नेहमीच मारहाण करतो, तुला मारल्यास कसे वाटेल असे म्हणत सागरने वनिताला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी बसवेश्वर हा गाडीच्या खाली उतरला. तेव्हा त्याचे डोके व कपाळ फुटलेले होते. यावेळी सागरने गाडी वळवूली बसवेश्वर यास जोराची धडक दिली.
यानंतर सागर व त्याचे साथीदार, अश्विनी व तिच्या मुलांना कारमध्ये घेऊन निघून गेले. वनिता व तिच्या पतीने गंभीर जखमी बसवेश्वरला उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे नेले. तेथे त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत फिर्याद वनिता म्हमाणे यांनी तुळजापूर ठाण्यात दिली. त्यावरून मृताची पत्नी अश्विनी, मेहुणा सागर सुभाष धबडे व त्याच्या अन्य ३ साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.