जळगाव ( प्रतिनिधी ) – बनावट कागदपत्रे, शिक्षणाधिकाऱ्यांची खोटी स्वाक्षरी करून शासनाची ६ लाखांमध्ये आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार २२ जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. याप्रकरणी इकरा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम अब्दुल मजीद सालार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात जळगाव शहर पोलिसांनी उपशिक्षक सय्यद अमरुल्लाह सय्यद चाँद कासार, त्यांचे वडील तथा संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर (दोन्ही रा. १०६, कोळीपेठ, मन्यारवाडा, जळगाव), तत्कालीन सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख नईमोद्दीन शेख अफजलोद्दीन (रा. परकोट मोहल्ला, नशिराबाद), जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र रघुनाथ चौधरी (रा. संभाजीनगर, जळगाव) आणि भडगाव उर्दू शाळेचे उपशिक्षक शेख जहीर शेख सलाऊद्दीन (रा. शिवाजीनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
असा उघड झाला प्रकार फिर्यादीनुसार, अंजुमन-ए-तालिमुल मुस्लेमीन या संस्थेच्या घटनेनुसार पदाधिकारी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक त्याच संस्थेत नोकरीवर असू शकत नाहीत. मात्र उपाध्यक्ष सय्यद चाँद कासार यांनी पदाचा दुरुपयोग करून आपला मुलगा सय्यद अमरुल्लाह याला २०१८ मध्ये शिक्षक म्हणून नियुक्त केले. या नियुक्तीचा मूळ प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रलंबित असताना संशयित आरोपींनी संगनमत करून तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट सही असलेला आदेश तयार केला.
न्यायालय आणि प्रशासनाची दिशाभूल या बनावट आदेशाच्या आधारे संशयित आरोपींनी विनाअनुदानित वरून अनुदानित तत्त्वावर मान्यता मिळवली आणि ‘शालार्थ वेतन प्रणाली’ मध्ये नाव समाविष्ट केले. इतकेच नव्हे तर, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून बनावट कागदपत्रांद्वारे न्यायालयाचीही दिशाभूल केली. याद्वारे शासनाकडून थकीत वेतनाचे ६ लाख २३ हजार ९७० रुपये आणि त्यानंतरचे नियमित वेतन असे एकूण लाखो रुपये लाटून शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
















