धरणगाव (प्रतिनिधी) आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीचे औचित्य साधून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरु करत असून तालुक्यात दहावीत पहिल्या आलेल्या पी. आर. हायस्कूलच्या विद्यार्थिनीला स्कूटीची भेट देऊन आम्ही वचनपूर्ती तर केलीच पण वीस टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारणाचा प्रत्यक्ष प्रत्यय दिला असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.
एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, सुभाषचंद्र बोस यांच्या टपाल तिकिटाचे संग्राहक प्रभाकर नेरपगार, धिरेंद्र पुरभे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिलीप महाजन, विलासराव पवार, किरण अग्निहोत्री आणि उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, गुलाबराव वाघ, प्रभाकर नेरपगार आणि मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक कैलास वाघ यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक संजय बेलदार यांनी तर आभार प्रदर्शन गणेश सूर्यवंशी यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.