जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील गुरांच्या बाजाराजवळ २९ ऑक्टोबर रोजी कार अडवून चालकाचा महागडा मोबाईल हिसकावून चोरटा फरार झाला होता. मोबाईल हिसकावून नेणाऱ्या फरार भामट्याला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने संशयीताला पोलिस कोठडीत रवाना केले.
याबाबत वृत्त असे की, लक्ष्मीनगरातील गिरणार अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेले मनोज सिताराम मवर्मा (वय-४३, रा. लक्ष्मीनगर) कार (एमपी.०४ सीएफ ८१२३) ने घराकडे जात असतांना रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी गाडी आडवी लावून मनोज यांची कार थांबवली. मनोज वर्मा कारमधून खाली उतरल्यावर वर्मा यांच्या नाकावर तोंडावर बुक्के मारुन शिवीगाळ करत, वर्मा यांच्या खिश्यातील २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला होता. दाखल गुन्ह्यात राहुल सुभाष सपकाळे (वय-२४,रा. मेस्कोमात नगर) याला ३० ऑक्टोबर रोजीच अटक झाली होती. तर, त्याचा साथीदार भुषण डिंगबर सपकाळे (वय-३४) हा गुन्हा घडल्या पासून फरार होता. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसींग पाटिल, गोविंदा पाटिल, सचिन पाटील यांच्या पथकाने संशयीताचा शोध घेत अटक केली. न्यायालयात हजर केल्यावर संशयीताची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.