मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता १९ जुलै पर्यंत ईडीच्या कोठडीत राहून पुढच्या चौकशीला आणि तपासाला सामोरे जावे लागेल.
तिनच दिवसांपूर्वी १२ जुलैला मुंबईतील पीएमएलए कोर्टानं १५ जुलैपर्यंत चौधरी यांची ईडी कोठडी वाढवली होती. त्यानंतर आज सुनावणीदरम्यान ही पुन्हा वाढ करण्यात आली. जमिनीच्या व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध असल्याने पुढील तपास आणि अधिक चौकशीसाठी आणखी कोठडी आवश्यक असल्याचे ईडीचे कोर्टाला सांगितल्यानंतर कोर्टाने ही वाढ केली. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ६ जुलैला रात्री अटक केली होती. या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा यांची देखील ईडीने चौकशी केली आहे.
ईडीच्या आरोपानुसार २०१६मध्ये खडसे महसूलमंत्री असताना पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीचा भूखंड गिरीश यांच्या नावे विकत घेतला गेला. पुण्यातील एका व्यावसायिकाने या व्यवहाराविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीच्या आधारे चौकशी, तपास करून खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी, गिरीश यांच्यासह जागेचे मूळ मालक अब्बार उकाणी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.
याच प्रकरणात एकनाथराव खडसे यांची देखील तब्बल ९ तास चौकशी ईडीतर्फे करण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.