जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य न मिळाल्याने जळगावमध्ये भाजपच्या कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
जळगाव शहरातील जी एम. फाउंडेशन या संपर्क कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल एक तास बंद दारा आड बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव लोकसभेतील उमेदवारांना पाहिजे तसं मताधिक्य न मिळाल्याने मंत्री गिरीश महाजन यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभेच्या जळगाव मतदार संघात स्मिताताई वाघ यांना एकूण तीन ते साडे तीन लाख एवढे मताधिक्य मिळेल, अशी मंत्री गिरीश महाजन यांची अपेक्षा होती. जळगाव शहरातूनही हक्काच्या बुथवर पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य मिळाले नाही. काही भागात हक्काचा मतदार होता, तिथे पण मतांचा टक्का न वाढल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावल्याचेही कळतेय.