जळगाव (प्रतिनिधी) साहेबांचा आकडा ३० चा आहे, तुला जे द्यायच ते दे, तुझ काम मी शंभर टक्के करुन देतो, असे म्हणत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या करीता अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना १५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात डॉ. भायेकर यांची भूमिका संशयास्पद असून त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. त्या करीता अटकेतील लाचखोर अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांना दि. ७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तक्रारदार हे जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी
पदावर कार्यरत असून त्यांची ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे सेवातंर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिनियुक्ती झाली असून त्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे काम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्याकडून करुन देतो. त्या करीता अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांना १५ हजारांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणात वरिष्ठांच्या नावाने लाचेची मागणी केली आहे. त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्याची काय भुमिका आहे याची देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपासणी केली जाणार आहे.
अटकेतील लाचखोर अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत जुलाल मोरे यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश राजूरकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. ७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र जी. काबरा यांनी कामकाज पाहिले.
कार्यमुक्तीच्या प्रक्रियेची घेणार माहिती
लाच स्विकारल्यानंतर अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कॅबिनमधून ताब्यात घेतले. प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी कार्यमुक्तीची प्रक्रिया, त्याचा प्रस्ताव कोणी तयार केला, कार्यमुक्त करण्याचे अधिकार कोणाला, ३० हजारांचा आकडा त्यांना कोणी सांगितला या सर्व बाबींची देखील चौकशी केली जाणार आहे
















