धरणगाव (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय किसान मोर्चाच्यावतीने महाराष्ट्र शासनाने गहू, मका व ज्वारी हमीभावाने खरेदी करून लवकरात लवकर केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चा व शेतकरी बांधवांच्यावतीने करण्यात येत आहे.
यावर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी सिंचनासाठी तीन आवर्तने देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी गहू, मका व ज्वारी पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. आता शेतकरी बांधवांच्या गहू व मका पीक काढणीला आल्यावर शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणत आहेत, तर शेतकरी बांधवांनी विक्रीस आणलेला मालाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.
शासनाने नुकतेच पिकांच्या बाबतीत हमी भाव जाहीर केलेले असून धरणगाव तालुक्यातील सर्वाधिक गहू, मका व ज्वारीची लागवड केली होती. शेतकऱ्यांना मात्र विक्रीस आणलेला मालाला रास्त भाव मिळत नाही. व स्थानिक व्यापारी मनमानी कारभाराने शेतकऱ्यांच्या मालाची लूटमार करीत आहेत. ज्वारी पिकाला शासकीय हमीभाव २५५० रुपये इतका असून स्थानिक व्यापारी मात्र ज्वारीला १४०० ते १६०० रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. तसेच मका पिकाला शासकीय हमी भाव खरेदी १८५० रूपये असून परंतु येथील स्थानिक व्यापारी ९०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करीत आहेत. राज्य शासनाने गहू, मका व ज्वारी पिकाची शासकीय खरेदी सुरू करावीत. जर शासनाने गहू, मका व ज्वारी खरेदी सुरू केली. तर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना शासनाच्या हमी भावाने लाभ मिळणार, पुढील काळात महाराष्ट्र शासनाने शासकीय खरेदी सुरू करावी, शासनाने खरेदी केंद्र सुरू न केल्यास राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे आंदोलन करण्यात येणार, अशी मागणी राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष मा. गोरख देशमुख व तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव करीत आहे.