पाळधी (प्रतिनिधी) : जिपीएस मित्र परिवार गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. या उपक्रमांत थंडीच्या दिवसांत निराधार लोकांसाठी उबदार कपडे वाटप, तसेच “अन्नविना कोणीही भुके राहू नये” या हेतूने दररोज सुमारे 200 लोकांसाठी भोजनाची सोय करण्यात येते. अपंग बांधवांना तीनचाकी इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप, 10वी-12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, गुरुजन सन्मान सोहळा, संत भोजन, तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठा कीर्तन सप्ताह असे अनेक उपक्रम जिपीएस मित्र परिवारतर्फे राबविण्यात आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, पाळधी शहरात कुठेही कोणाच्या घरी दुःखद घटना घडली, तर त्या परिवारासाठी “स्नेहाची शिदोरी” पाठविण्याची प्रथा मित्र परिवाराने ठेवली आहे. मित्र परिवारातील एक सदस्य निधन झाल्यानंतर, त्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाळधी येथील स्मशानभूमी दत्तक घेऊन, त्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आले असून, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक लहानसा बगीचा तयार केला जात आहे.
अशा या उपक्रमात भर म्हणून, मित्र परिवाराने आज एक अनोखा कार्यक्रम घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. पाळधी शहरात कोणाच्याही घरी दुःखद घटना घडल्यास, त्या परिवाराला मदत म्हणून 2 मंडप, चटया, 5 पाणी जार, 2 चहा थर्मास, 40 खुर्च्या तसेच भोजन पट्टीचे साहित्य जिपीएस मित्र परिवारतर्फे देण्यात येणार आहे. उद्देश एकच — “समोरच्याच्या दुःखात सहभागी होणे.”
या नवीन उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या सोहळ्यादरम्यान अनेकांचे डोळे पाणावले. अशा या सामाजिक कार्यासाठी पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, युवा उद्योजक विक्रम पाटील यांचे नेहमी सहकार्य लाभत असते.
कार्यक्रमासाठी पाळधी शहरातील ज्येष्ठ मंडळी शरद काका कासट, कृष्णासाहे बिचवे, पंढरीनाथ ठाकूर, भिला अप्पा रोकडे, अजीज मणियार, सर फुलपगारदादा देवरे, माजी सभापती संजय पाटील, सरपंच विजय पाटील, शरद कोळी, दिनेश जोशी बाबा तसेच पत्रकार बांधव महेश बाबा झंवर, संजू भैया देशमुख, गोपाळ सोनवणे, दीपक झंवर उपस्थित होते.
या वेळी श्रीराम जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती शरद काका कासट यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पाळधी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारे गायच्या शेणाच्या गवरी ते स्वतःच्या खर्चाने उपलब्ध करून देतील तसेच त्यासाठी एक शेड उभारून देतील.
अशा या अनोख्या कार्यक्रमाची चर्चा परिसरात होत असून, सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जिपीएस मित्र परिवाराच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
















