नाशिक (वृत्तसंस्था) ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करून एक लाख चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाढोली (ता. त्र्यंबक) येथील ग्रामसेवकास यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अनिलकुमार मनोहर सुपे (वय ४६), असे संशयिताचे नाव आहे.
शासकीय ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. यातील तक्रारदाराने वाढोली ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामे घेतलेली होती. ही कामे तक्रारदार यांनी विहित कालावधीत पूर्ण केली. यातील काही कामांची बिले मिळाली; तर दोन लाख ९९ हजार ७७६ रुपयांचे बिल वाढोली ग्रामपंचायतकडे बाकी होते. याविषयी ठेकेदाराने ग्रामसेवक सुपे यांच्याकडे बिलाबाबत विचारणा केली. परंतु, हे बिल मंजुर करण्यासाठी ३० हजार रुपये व यापूर्वी तक्रारदाराच्या केलेल्या बिलांचे बक्षीस म्हणून ७० हजार रुपये, सर्व बिलांचे ऑडिट करण्याचे चार हजार रुपये असे एकूण एक लाख चार हजार रुपयांची लाच ग्रामसेवक सुपे यांनी मागितली. गुरुवारी (दि. ३०) ही लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलिमा डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, प्रभाकर गवळी, पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.