श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुपवाडामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचा समावेश आहे.
कुपवाडामधील चकमकीत मंगळवारी पहाटे कुपवाडा जिल्ह्यातील कांडी भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज पहाटे कांडीमध्ये शोधमोहीम सुरू केल्यानंतर चकमक सुरु झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दल चोख प्रत्युत्तर दिलं. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितलं की, लष्करचे दोन दहशतवादी चकमकीत ठार झाले. तर तुफैल असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानचा रहिवासी होता.
गेल्या 12 तासांतील ही दुसरी चकमक आहे. याआधी सोमवारी संध्याकाळी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केला. अंधाराचा फायदा घेत दोन पाकिस्तानी आणि एक स्थानिक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल, पाच मॅगझिन आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार त्याची ओळख हंजला, पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी आहे.