धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री झाल्यापासून ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगावातील पाण्याची समस्या मिटावी म्हणून कोट्यवधींचा निधी दिला आहे. अगदी नुकताच ४० कोटीचा निधी देत शहराची पाणी समस्या कायमची मार्गी लागावी म्हणून सतत प्रयत्नशीलही आहेत. परंतू फक्त नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे ना. पाटील यांना काल नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची भावना गुलाभाऊंवर प्रेम करणाऱ्यांच्या गोटातून व्यक्त होत आहे.
गेल्या वीस ते बावीस दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा खंडित असल्यामुळे धरणगावकरांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा तातडीने सुरुळीत करण्याच्या मागणीसाठी तसेच ओबीसी आरक्षणासाठी पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांना काळे झेंडे दाखवून भाजपने जोरदार आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते देखील समोर आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ना. गुलाबराव पाटील यांनी नुकताच शहरात नवीन पाईप लाईनसाठी ४० कोटीचा निधी मंजूर केला आहे. एवढेच नव्हे तर, जलशुद्धीकरण प्रकल्पाचा विषय देखील मार्गी लावला आहे. परंतू पालिकेच्या वर्तुळात अंतर्गत लाथाळ्यांमुळे पाण्याच्या समस्येकडे पाहिजे तसं लक्ष दिले जात नाहीय. स्व. सलीमभाई पटेल हे नगराध्यक्ष असताना धरणगावला पाच-सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. मग आताच असे काय झाले आहे की, पाण्याचे नियोजन कोलमडले आहे?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्री या नात्याने ना. गुलाबराव पाटील यांनी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कधीही धरणगाव पालिकेला निधीची कमतरता पडू दिली नाही. अगदी पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. जर निधी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. तर मग पाणी पुरवठा सुरळीत का होत नाही?. पालिका प्रशासनाचा नाकर्तेपणाचा मनस्ताप प्रत्येकवेळी गुलाबभाऊंनी का सहन करावा?, असे संतप्त सवाल गुलाबभाऊंवर प्रेम करणारे आता खाजगीत आता विचारायला लागले आहेत. पाण्याच्या नियोजनाकडे पालिका प्रशासनाने थोडं गांभीर्याने लक्ष दिल्यास धरणगावातील पाणी टंचाई निश्चित नियंत्रणात आणली जाऊ शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ना. पाटील यांनी काल नगरसेवकांना चांगलेच खडसावल्याचेही कळते.
ना. पाटील हे निधी उपलब्ध करू शकतात. परंतू खालील यंत्रणा तर पालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सांभाळणे अपेक्षित आहे. परंतू नको त्या कामांमध्ये अधिकचे लक्ष घातल्यामुळे पाणी वितरणाकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप सध्या पालिकेच्या प्रशासनावर होत आहे. पाईप लाईन फुटणे, मोटार जळणे या तांत्रिक समस्या तात्काळ सोडवून त्यावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतू पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे मलईदार कामांकडे अधिक लक्ष असल्यामुळे पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच शहराची पाणी टंचाई कायम असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, धरणगावातील भाजपच्या आंदोलनामुळे पालिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
















