
जळगाव (प्रतिनिधी) – संत कबीरांच्या काव्याचा, साहित्याचा आणि दोह्यांमधून व्यक्त होणाऱ्या विचारविश्वाचा संगीतमय शोध घेणारा ‘हंस अकेला’ हा परिवर्तन, जळगाव निर्मित विशेष सांगीतिक कार्यक्रम येत्या ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे सादर होणार आहे. मुंबईतील प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात हा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला असून, याच कार्यक्रमात कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘हंस अकेला’ ही परिवर्तन, जळगावची एक महत्त्वपूर्ण सांगीतिक निर्मिती असून, संत कबीरांच्या विचारांचा आणि त्यांच्या समृद्ध साहित्यविश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. संत कबीरांचे काव्य, दोहे आणि त्यामधून व्यक्त होणारे मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान संगीताच्या प्रभावी माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
कार्यक्रमात गोविंद मोकाशी, पांडुरंग पाटील, श्रद्धा पुराणिक, अंजली धुमाळ, रोहित बोरसे, वरुण नेवे, यश महाजन , अक्षय दुसाने हे सहभागी होणार असून कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शक नारायण बाविस्कर, संगीत दिग्दर्शक सुदीप्ता सरकार व मंजुषा भिडे , तंत्र साहाय्य राहुल निंबाळकर, अक्षय नेहे, निर्मिती प्रमुख हर्षल पाटील व मंगेश कुलकर्णी हे आहेत.
कबीरांच्या काव्यातील कालातीत आशयाला संगीताची जोड देत हा कार्यक्रम आजच्या काळाशी संवाद साधणारा ठरणार आहे. परिवर्तन, जळगावने साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या निर्मितीचा प्रयोग आता मुंबईतील रसिकांसमोर सादर होत असून, साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
















