जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीने गावाकडे निघालेल्या दाम्पत्याला भरधाव आयशरने धडक दिल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला तर सुदैवाने चिमुकला बचावल्याची घटना नशिराबादजवळील महाजन हॉटेलजवळ शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. शेनफडू बाबूराव कोळी (35), भारती शेनफडू कोळी (32, सामरोद) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत तर रूद्र कोळी (3) हा चिमुकला अपघातात बचावला असून त्यास किरकोळ दुखापत झाली आहे.
शेनफडू कोळी हे त्यांची पत्नी भारती कोळी मुलगा रुद्रसह सामरोद येथे कुटुंबासह शेती काम करून राहतात. ते शनिवार, 24 जून रोजी सकाळी आसोदा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. तेथून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ते परत निघाले. नशिराबादहून कुर्हा ार्गे सामरोदला जाण्यासाठी ते दुचाकी (क्र.एम.एच.19 ए.ए.2095) ने निघाले असता नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले.
या अपघातात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस व नागरीकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवल्यानंतर उपचारादरम्यान शेनफडू याचा मृत्यू झाला. सुदैवाने रुद्र कोळी हा चिमुकला अपघातात बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच कोळी परीवाराच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली असून दाम्पत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे व कर्मचार्यांनी अपघातस्थळी धाव घेत आयशर वाहन जप्त केले तर चालक मात्र, पसार झाला आहे.