धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील एसएसबीटी कॉलेज समोरील रस्त्यावर समोरासमोर झालेल्या मोटार सायकल अपघातात धरणगाव येथील हिरामण कुंभार जखमी झाल्याची घटना घडली होती. आता याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हिरामण भागवत कुंभार (वय ४५, रा. गणपती नगर सावखेडा रोड, जोगेश्वरी माता मंदिरामागे पिंप्राळा जळगाव) हे त्यांची मोटारसायकल (क्र. एम.एच १९ डि.एम. ९८२१) ने पाळधीकडून जळगावकडे जात होते. त्याचवेळी जळगावकडून पाळधीकडे येणारी मोटारसायकल (क्र. एम. एच. १९ ए.एम. ५१९१) वरील चालकाने धडक दिल्याने हिरामण कुंभार याच्या पायास, छातीस व कपाळावर मार लागूनउजवा पाय व छातीस फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान, यावेळी मोटार सायकल चालक फरार झाला होता. याप्रकरणी जखमी हिरामण कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.काँ विजय सिताराम चौधरी करीत आहेत.