जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील पिंप्राळा हुडको परिसरात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाची, मुलीच्या कुटुंबीयांनी अमानुषपणे हत्या केली. इतकेच नाही, तर आरोपींनी या हल्ल्यात पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनाही गंभीर जखमी केले आहे.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी ऑनर किलिंगसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.
पिंप्राळा हुडको परिसरात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. मुकेश रमेश शिरसाठ (वय 30) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो आपल्या कुटुंबासोबत या परिसरात राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याने याच भागातील एका तरुणीसोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. या विवाहामुळे तरुणीच्या कुटुंबीयांचा राग सातत्याने मुकेशवर होता.
या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी असून, मृत मुकेशची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती आहे. दोघांचा संसार सुखात सुरू असतानाही मुलीच्या कुटुंबीयांचा राग शांत झाला नाही. अखेर, रागाच्या भरात आरोपींनी मुकेशवर कोयता आणि चॉपरने हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली.
मुकेश रमेश शिरसाठ दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर पडताच, मुलीच्या कुटुंबीयांनी कोयता आणि चॉपरने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात मानेवर गंभीर वार झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला.
मुकेशची हत्या केल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी मुकेशच्या कुटुंबीयांवरही हल्ला केला. या हल्यात मृत मुकेशचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ आणि चुलत बहीण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.