धुळे (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने दोंडाईचा – धुळे रस्त्यावर असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपशेजारी केलेल्या कारवाईत बायो डिझेज सदृश्य साठा हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत १५ लाख ३३ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात ५ जणांविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात, नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, दोंडाईचा पोलीस ठाणे हद्दीतील धुळे दोंडाईचा बायपास – रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाशेजारी बायोडिझेल पंप सुरु आहे. या ठिकाणी पथकाने छापा टाकला असता बाळू गंगाधर जोशी (वय ४२ रा. डांबरी घरकुल दोंडाईचा), शेख सलीम महम्मद यासीन (वय ५५), शेख अबरार शेख सलीम (वय १९, रा. कैसर कौलनी, औरंगाबाद), वसीम नबू पिंजारी, दीपक प्रदीप साळुंखे (दोघे रा. दोंडाईचा), या ५ जणांनी आपआपसात संगनमत करुन वरील ठिकाणी लोखंडी टाक्यांमध्ये ठरवुन दिलेल्या अत्यावश्यक बायो डिझेल सदृश्य द्रव्याचा साठा केला.
तसेच वैध मापन अधिकृत नसलेल्या मशिनच्या सहाय्याने हे बायो डिझेल बाहेर काढून विनापरवाना व अनधिकृतरित्या बायोडिझेल पेट्रोल पंप उघडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कुठलीही सुरक्षात्मक उपाययोजना न करता बायोडिझेज सदृश्य ज्वालाग्रही द्रव्याचा साठा करुन त्याची विक्री करतांना मिळून आले.
या कारवाईत पथकाने १५ लाख ३३ हजार ८०० रुपये किमतीचा बायोडिझेलसह इतर साहित्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी विशेष पथकातील हवालदार रवींद्र स्वरुपसिंग पाडवी (५२) यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील ५ जणांविरुध्द भादंवी कलम २८५, १३६, ३४ सह जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.