उस्मानाबाद (वृत्तसंस्था) चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळून दोन ऊसतोड मजूराचा मृत्यू झाला. ही दूर्घटना कळंब तालुक्यातील खामसवाडी शिवारात सोमवारी (दि.१९) रात्री घडली. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खामसवाडी येथील शेतकरी भारत सदाशिव शेळके यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती. यवतमाळ जिल्ह्यातील ऊसतोड मजूर सुनिल संतोष आगलदरे (वय २१) व भुषण रामकृष्ण शिडाम (वय १८, दोघे रा. विठोली, ता. दिग्रस) हे मजूर ऊसतोडीसाठी आले होते. सोमवारी (दि.१९) रात्री ९ ते १०.३० या कालावधीत मजूरांनी शेतकरी शेळके यांचे महिद्रा कंपनीचे जुने टँक्टर परस्पर चालू केले.
ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीमध्ये ट्रॅक्टर कोसळले. या अपघातात ऊसतोड मजूर आगलदरे व शिडाम यांचा विहीरीमध्ये पडून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती समजताच शिराढोण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील व बीट जमादार मेंगले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. रात्री क्रेनच्या सहाय्याने विहीरीतील ट्रॅक्टर काढण्यात आले. मोटारीच्या सहाय्याने पाणी काढून मृतांचे प्रेत बाहेर काढण्यात आले.