जळगाव (प्रतिनिधी) कला क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ आवड असणाऱ्या जळगावातील काही तरुणांनी हे प्रत्यक्षात सिद्ध केले आहे. आजवर एकाच रिदममध्ये पाहायला मिळणाऱ्या अहिराणी संगीताला त्यांनी ‘वेस्टर्न बिट्स’ची जोड दिली आहे. ‘वेस्टर्न बिट्स’ आणि अहिराणी भाषा यांची सांगड घालून त्यांनी अहिराणी संगीताचा एक नवा पॅटर्न समोर आणला आहे.
काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मनी बाळगलेल्या इच्छेला प्रयत्नांची जोड मिळाली, तर निश्चितच जगावेगळे घडते. कला क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ आवड असणाऱ्या जळगावातील काही तरुणांनी हे प्रत्यक्षात सिद्ध केले आहे. आजवर एकाच रिदममध्ये पाहायला मिळणाऱ्या अहिराणी संगीताला त्यांनी ‘वेस्टर्न बिट्स’ची जोड दिली आहे. ‘वेस्टर्न बिट्स’ आणि अहिराणी भाषा यांची सांगड घालून त्यांनी अहिराणी संगीताचा एक नवा पॅटर्न समोर आणला आहे. ‘वेस्टर्न बिट्स’ आणि अहिराणी भाषेचा सुरेल मिलाफ असलेले त्यांचे एक गाणे लवकर रसिकांच्या भेटीला येत आहे. अहिराणी संगीताचा हा नवा पॅटर्न रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास त्यांना आहे.
सर्व जळगाव जिल्ह्यातील तरुण -प्रवीण लाड, प्रदीप भोई आणि चारुदत्त पाटील, अशी या ध्येयवेड्या तरुणांची नावे आहेत. त्यांची इतर मित्रमंडळीही त्यांना या प्रयोगात साथ देत आहे. विशेष म्हणजे, हे सर्वच तरुण पदवीधर आहेत. करिअरची वाट शोधत असतानाच त्यांनी आपली आवड जोपासली आहे. किंबहुना आता पुढे जाऊन त्यांना कला व संगीत क्षेत्रातच करिअर करायचे आहे. हे सर्व तरुण जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. योगायोगाने एकत्र आल्यानंतर त्यांनी अहिराणी संगीताला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवीण लाड याने यापूर्वी अनेक गाण्यांमध्ये नायक म्हणून भूमिका केली आहे. तर प्रदीप भोई हा गेल्या १० वर्षांपासून नाट्य, नृत्य, संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने ‘स्वप्न’ नावाचा एक चित्रपटदेखील दिग्दर्शित केला आहे. मात्र, कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले आहे. नवं गाणं येणार भेटीला -या तरुणांनी ‘एक तरफा प्यार’ शीर्षक असलेले एक नवं गाणं बनवले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, ते अहिराणी बोलीभाषेतील गाणं आहे. त्यात त्यांनी अहिराणी संगीताला त्यांनी ‘वेस्टर्न बिट्स’ची जोड दिली आहे. त्यामुळे हे गाणं हिंदी व मराठी संगीताच्या तोडीचे असेल, असा विश्वास त्यांना आहे. या गाण्याची निर्मिती राजस एंटरटेनमेंट, डीजे गोलू (धरणगाव) यांनी केली आहे. तर दिग्दर्शन प्रदीप भोई, गीतकार कुणाल पवार आणि गाण्याची शब्दरचना भैय्यासाहेब मोरे यांची आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात मुख्य नायकाची भूमिका प्रवीण लाड यांनी तर, नायिका म्हणून मयुरी साळुंके व अंकिता चौधरी यांनी भूमिका साकारली आहे. श्रावणी तारकस, निलेश पाटील व संदीप मोरे यांनीही सह पात्र म्हणून जबाबदारी निभावली आहे.
‘एक तरफा प्यार’ हे गाणे नुकतच म्हणजेच 25 एप्रिलला यूट्यूबवर लॉंच झाला आहे. त्यानंतर अवघ्या 1 दिवसांतच या टीझरला पाच हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी बघितले आहे. तसेच शेकडो लाईक्सचा पाऊस पडला आहे. हे गाणं सोशल मीडियावर ते धुमाकूळ घालेल, अशी अपेक्षा आहे. हे गाणं जळगावातील रायसोनी महाविद्यालयाच्या आवारात चित्रित केले आहे. कोणत्याही प्रकारच्या आवश्यक सोयीसुविधा व संसाधने तसेच आर्थिक पाठबळ नसताना या तरुणांनी कला क्षेत्रात पुढे जाण्याचे शिवधनुष्य पेलले आहे….म्हणून केला प्रयत्न! -अहिराणी संगीत क्षेत्रात आजवर एकाच रिदमची गाणी आली आहेत. ती रसिकांच्या पसंतीला देखील उतरली आहेत. परंतु, हिंदी व मराठी संगीत क्षेत्रात ज्या प्रमाणे कालानुरूप बदल झाले; त्या तुलनेत अहिराणी संगीतात तसे बदल झालेले नाहीत. म्हणूनच अहिराणी संगीताकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. अहिराणी संगीताकडे बघण्याचा हाच दृष्टिकोन बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. हिंदी व मराठी संगीतात ज्याप्रमाणे उच्च कोटीचे दिग्दर्शन आणि पात्र असतात, त्याला तोडीस तोड दिग्दर्शन, पात्र आणि अभिनय अहिराणी संगीतात देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही वेस्टर्न बिट्स सोबत अहिराणी भाषेची सांगड घातली आहे. हा वेगळा पॅटर्न देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला रसिकांची निश्चितच पसंती लाभेल, असा आत्मविश्वास या तरुणांनी व्यक्त केला.