जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे भोसरी जमीन व्यवहारामुळे आधीच ईडीच्या चौकशीमुळे अडचणीत सापडले आहे. त्यानंतर आता खडसे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना आदेश दिला आहे. त्यामुळे खडसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस या तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने याबाबत अंजली दमानिया यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून, खडसे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
२०१७ रोजी विक्रोळी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी २ सप्टेंबर २०१७ रोजी मुक्ताईनगर इथे आपल्या वाढदिवसा प्रसंगी बोलताना अंजली दमानिया यांना उद्देशून वक्तव्य केले होते. या प्रकरणी अंजली दमानिया यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी विक्रोळी पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान कुठलीही कार्यवाही होत नसल्याने अंजली दमानिया यांनी २७ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दिली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घेत, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.