साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथे गावात सध्या डासांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून डासांमुळे अनेक आजार उध्दभवत आहे. या आजारी रुग्णांमुळे सध्या प्रा.आरोग्य केंद्रासह गावातील खाजगी दवाखाने फुल्ल झालेले असल्याचे दिसून येत आहे.तर सध्या कोरोनाची महामारी असल्यामुळे आजारी रुग्णांची सुद्धा चिंता वाढत असते. तरी या गंभीर समस्येकडे ग्रामपंचातय व आरोग्य प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे व डासांचा बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण गावात फवारणी व साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
याबाबत सविस्तर असे की, वातावरणातील बदलांमुळे तसेच व गावातील काही ठिकाणच्या अस्वच्छतेमुळे गावात सर्वत्र डासांच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. संध्याकाळच्या वेळेस डास एवढेच चावतात की, यादरम्यान घरात व बाहेर बसणेही कठीण होऊन जाते. घराबाहेर बाहेर बसल्यास डासांचे थवेच्या- थवे आजूबाजूला फिरत असतात. डासांच्या चाव्याने अंग खाजवत असते. व शारीरिक त्रास होत असतो. डासांच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे, गावातील अस्वच्छता हे असून गावात काही ठिकाणी सफाई कामगार वेळीच पोहचत नसल्याने त्या भागातील गटारींची साफसफाई होत नाही. त्यामुळे सांडपाणी तुबते असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावात टाइफाइड व मलेरिया या सदृश्य आजारांसह थंडी ताप येणे, मळमळणे, शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होणे अशा विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी मोठी गर्दी होतांना दिसून येत आहे. तर जास्त आजारी असल्यास काही रुग्णांना बाहेरगावी जाऊन उपचार घ्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे सर्वत्र कोरोनाची महामारी असल्याने ताप सदृश्य आजारांची लक्षणे असलेला रुग्ण आढळला तर सर्वांची चिंता वाढत असते. तेव्हा हि बाब ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजीची बनली आहे. एकूणच सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
संपूर्ण गाव स्वच्छतेची गरज- ग्रामपंचायतीकडे सफाई कामगारांची संख्या कमी असल्याने दोन-दोन महिन्यानंतर गटारी स्वच्छ होत असतात. तर काही भागात वेळच्या वेळी गटारींची स्वच्छता होत नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तर काही ठिकाणी नागरिक कोणाचाही विचार न करता भरवस्तीत कचरा टाकत असल्याने जणू काही कचऱ्याचे ‘डम्पिंग ग्राउंड ‘बनले आहे. यामुळे परिसरात अस्वच्छ वातावरण निर्माण होऊन डास निर्माण होत असतात. तरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आता ‘ गाव स्वच्छता अभियान ‘ राबविण्याची गरज असून गावात डासनाशक औषधांची फवारणी करण्याची गरज आहे. तसेच गावात स्वच्छतेबाबत जनजागृती होणे ही तितकीच महत्त्वाची आहे.
आरोग्य प्रशासनाकडून लक्ष देण्याची गरज ! – गावातील स्वच्छतेबाबत तसेच नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी जनजागृती व इतर उपाययोजना करण्याची जबाबदारी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. मात्र या प्रशासनाकडून फक्त पत्रव्यवहार केला जातो. व कोरे कागद काळे केले जातात मात्र वेळीच ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एकूणच या प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.