जळगाव (प्रतिनिधी)- इनरव्हिल क्लब जळगाव, शासकिय वैद्यकीय होमीपॅथी महाविद्यालयातर्फे आशा स्वयंसेविका यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. आशा स्वयंसेविका यांनी केलेल्या निस्वार्थ सेवा, कठोर परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी व कोरोना काळासह मातृत्व काळजी, बाल आरोग्य, लसीकरण मोहीम, कुपोषण निर्मूलन मध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या जळगाव शहरातील २१६ आशा स्वयंसेविकांना गौरवपत्र, गिफ्ट देऊन सन्मान केला गेला.
गणपती नगर मधील रोटरी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कांताई नेत्रालयाच्या डॉ. भावना जैन उपस्थित होत्या. त्यांच्यासमवेत व्यासपीठावर महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप, इनरव्हिल क्लब अध्यक्षा सौ. उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी उपस्थित होत्या. आमदार सुरेश भोळे यांनीही कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आशा स्वयंसेविकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील यांनी आयोजनामागील भुमिका सांगितली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य समितीतर्फे रूग्णांसाठी असणाऱ्या सुविधांची माहिती दिली. आशा वर्कर यांचा सन्मान, हेल्थ कार्ड वाटप व भोजनाची व्यवस्था ही संकल्पना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची असल्याचेही डॉ. रितेश पाटील म्हणाले.
डॉ. घोलप यांनी प्रत्येक आशा ही सर्वदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत शासनाच्या सेवा देताना महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. त्यामुळे ही कौतूकाची शाबासकी त्यांना उभारी देईल. या कार्यक्रमाप्रसंगी इनरव्हिल क्लबच्या पिडीसी नूतन कक्कड, पिडीसी संगीता घोडगावकर, खजिनदार गुंजन कांकरिया, सी सी रंजन शहा व सदस्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार डॉ. रितेश पाटील यांनी मानले.
आरोग्य सेवेचा आत्मा आशा स्वयंसेविका – उषा जैन
आरोग्य सेवे सारखे महत्त्वाचे काम आशा स्वयंसेविकांतर्फे केले जाते, आरोग्य व्यवस्थेचा आत्मा म्हणजे आशा स्वयंसेविका आहेत त्यांच्यासाठी महिला दिनानिमित्त विशेष प्रकल्प करता आला हे आमच्यासाठी खूप मोलाचे ठरले, असे मनोगत क्लब अध्यक्षा उषा जैन यांनी व्यक्त केले.
आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्त्वाचे – डॉ. भावना जैन
देश सध्या महासत्ता होऊ पाहत आहे. मात्र ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था ही सदृढ असेल तर महासत्ता होण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. आशा स्वयंसेविका ह्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्यांना उपचाराबाबत विश्वास देतात हाच विश्वास आरोग्य सुधारण्यासाठी कामा येतो त्यामुळेच आशा स्वयंसेविकांचे योगदान उल्लेखनिय आहे. कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्यात त्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. एखादा रूग्णाची ओळख करणे त्याची प्राथमिक तपासणी करणे यासाठी विशेष प्रशिक्षण कांताई नेत्रालयातर्फे दिले जाते त्यात काही आशा स्वयंसेविकांचाही समावेश होता असेही डॉ. भावना जैन म्हणाल्यात.
आत्मविश्वास वाढविणारा सन्मान
महिला दिनानिमित्त अनेक उपक्रम होत असतात मात्र इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांच्यासह सहकाऱ्यांनी घेतलेला हा उपक्रम आम्हाला प्रेरणा देणारा आहे. गौरवपत्र, गिफ्ट सह आदरपूर्वक भोजन यामुळे आणखी काम करण्याचा आत्मविश्वास वाढल्याची प्रतिक्रिया आशा स्वयंसेविकांच्या वतीने पौर्णिमा वाणी व भारती पाटील यांनी दिली.
हेल्थ कार्डच्या माध्यमातून संवेदना हॉस्पिटलने घेतली आशा स्वयंसेविकांच्या परिवाराच्या उपचाराची जबाबदारी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून सर्व आशा स्वयंसेविकांना हेल्थ कार्ड चे वाटप करण्यात आले. त्यात ओपीडी मोफत, अपघात शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया व उपचार, निमोनिया, संधीवात, हृदयासंबंधित उपचार, मधुमेह व रक्तदाब शस्त्रक्रिया, थायरोड, सर्पदंश, सांधेबदल, सर्व प्रसूती सवलती दरात यासह औषधींमध्ये विशेष सुट असे वैद्यकिय लाभ हेल्थ कार्ड धारकांना उपलब्ध करून दिले आहे. आशा स्वयंसेविकेसह त्यांच्या परिवारातील सदस्यांची उपचारांची जबाबदारी या कार्डनुसार संवेदना हॉस्पिटल घेणार असल्याची माहिती डॉ. रितेश पाटील यांनी दिली.