जळगाव (प्रतिनिधी) शेजारी महिलेच्या आत्महत्येप्रकरणी सासू-सुनेची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. साक्षीदारांच्या जबाबातील तफावती, अविश्वासार्हता, तसेच तपासकामातील तृटी आदींचा विचार होवून जळगाव येथील चौथे जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. जी. ठुबे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
डोण दिगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथील मयत कविता खंडू वाघ व आरोपी रंजनाबाई बापू वाघ व तिची सून वर्षा राजू वाघ यांची घरे समोरासमोर आहेत. घटनेच्यापूर्वी म्हणजे दि. ०५ सप्टेंबर २०१७ च्या सहा महिन्यापूर्वी मयत कविता वाघ हिच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यादिवशी आरोपी वर्षा वाघ हिचा पती राजू बापू वाघ याने कविता वाघ हीच्या घरी जावून तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कविता वाघ, तिचा पती फिर्यादी खंडू वाघ व मुलांचे स्वतंत्र फोटो त्याच्या मोबाईल मध्ये काढले होते. तसेच फिर्यादीच्या कुटुंबासोबतदेखील राजू वाघ याने फोटो काढले होते. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी आरोपी वर्षा वाघ व तिची सासू रंजनाबाई वाघ या दोघींनी राजू वाघ याने त्याच्या मोबाईल मध्ये मयत कविता वाघ हीचे काढलेले फोटो गावातील लोकांना दाखवून, मयत कविता वाघ व राजू वाघ यांचे अनैतिक संबंध आहेत, असे सांगून कविता हिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले व तिची बदनामी केली. याबाबत कविता वाघ हिने तिचा पती फिर्यादी खंडू जमा वाघ यास सांगितल्यावर त्याने राजू वाघ यास विचारपूस केली असता, त्याने सांगितले की, “कविताताई ही माझ्या बहिणीसारखी आहे, मी कोणतीही बदनामी केलेली नाही व हे सर्व कारस्थान माझी पत्नी वर्षा व आई रंजनाबाई वाघ यांचे आहे.” त्यानंतर फिर्यादी खंडू वाघ याने पत्नी कविता हिची समजूत घालून, तिने मनावर घेऊ नये असे सांगितले. घटनेच्या दीड महिन्यापूर्वी आरोपी वर्षा वाघ हिने तिचा पती राजू वाघ याचा मोबाईल फोडून टाकला होता. घटनेच्या दोन-तीन दिवस पूर्वीपासून आरोपी वर्षा व रंजनाबाई या दोघी कविता वाघ हिच्या घरासमोर येवून तिला अश्लील शिवीगाळ करीत होत्या व तिला धमकी देत होत्या की, “तुझ्यामुळे राजू दारू प्यायला लागला आहे व तो आम्हालादेखील मारहाण व शिवीगाळ करीत आहे, तो घरातून निघून गेला आहे, त्याचे जर काही बरे-वाईट झाले तर आम्ही जीवाचे कमी-जास्त करून घेवू.” दि.०५-०९-२०१७ रोजी सकाळी साडे-दहा वाजेच्या सुमारास दोन्ही आरोपी महिला कविता वाघ हिच्या घरासमोर आल्या व तिला वाईट-साईट शिवीगाळ करून धमकी देत होत्या की, “तुझ्यामुळे राजू वाघ याने जीवाचे बरे वाईट केले, तर तुला पण जिवंत सोडणार नाही,” असे म्हणून त्या दोघी कवितास मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून जात होत्या. या प्रकारामुळे कविता वाघ हिस प्रचंड मनस्ताप झाला व संतापाच्या भरात तिने दुपारी दोन वाजता अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. त्यामुळे तिचा पती खंडू वाघ याने तिला धुळे येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता, तेथे डॉ. अरुणकुमार नागे व पो.हे.कॉ. संतोष सोनवणे यांनी तिचे दोन स्वतंत्र मृत्युपूर्व जबाब नोंदविले, त्यात तिने वरीलप्रमाणे हकीकत सांगितली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री कविता वाघ हिचा जळाल्यामुळे मृत्यू झाला व तिला आत्महत्या करण्यास दोन्ही आरोपींनी भाग पाडले, अशी फिर्याद फिर्यादी खंडू जामा वाघ याने चाळीसगाव पो.स्टे.ला दिल्यावरून पोलिसांनी गु.र.नं.७४/२०१७ अन्वये भादंवि कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
सदर खटला चौकशीवेळी सरकारपक्षातर्फे फिर्यादी खंडू जामा वाघ, मयताची सासू रुखमाबाई वाघ, मृत्युपूर्व जबाब नोंदविणारे डॉ. अरुणकुमार नागे व पो.हे.कॉ. संतोष सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश देवराज, तपासी अंमलदार पो.उ.नि. रमेश मानकर यांचेसह एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जबाबातील तफावती, अविश्वासार्हता, तसेच तपासकामातील तृटी आदींचा विचार होवून जळगाव येथील चौथे जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. जी. ठुबे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सदर खटल्याचे कामी दोन्ही आरोपींतर्फे ॲड. वसंत आर. ढाके यांनी बचावाचे काम पाहिले. त्यांना ॲड. प्रसाद ढाके, ॲड. निरंजन ढाके, ॲड. भारती ढाके, ॲड. उदय खैरनार व ॲड. श्याम जाधव यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ बी. चौधरी यांनी काम पाहिले.