जळगाव (प्रतिनिधी) बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संयुक्त महाविकास आघाडीच्या उमेदवार खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा क्षेत्रात वारजे, माळवाडी, धायरी व इतर ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या व मतदारांनी आपला मतदानरुपी आशीर्वाद सुप्रिया सुळे यांना देऊन पुनश्च एकदा सुप्रिया सुळे यांना सेवेची संधी देण्याची विनंती केली
यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या विद्यमान सत्ताधारी हे बहुमताच्या जोरावर हम करे सो कायदा या वृत्तीने वागून हुकूमशाही कडे वाटचाल करत असुन, खोटे आश्वासने भूलथापा देऊन सत्तेत आले. सत्तेतआल्यावर गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी एकही आश्वासन पुर्ण केले नाही. त्यामुळे देशासमोर महागाई, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट बनले आहेत यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली असुन सत्ताधाऱ्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसुन सत्ताधारी फोडा आणि राज्य करा हि निती राबविण्यात व्यस्त आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.
म्हणून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि संविधानाची होत असलेली पायमल्ली रोखण्यासाठी सद्विवेक बुद्धीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून सत्ताधाऱ्यांना आता सत्तेतून चले जाव म्हणायची वेळ आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचा विकासाचा वसा आणि वारसा समर्थपणे चालवणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज,शाहू- फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पाईक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ध्येय धोरणांवर चालणाऱ्या सुप्रिया सुळे या खासदार, लोकप्रतिनिधी म्हणुन तुम्हाला लाभल्या आहेत. त्या जनतेची सेवा, शेतकरी- कष्टकरी व महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान, ही त्रिसुत्री सदैव डोळ्यासमोर ठेवून कार्य करून बारामती लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करत आहेत. परंतु काही लोक भाजपच्या संगतीत गेल्याने ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला गेल्यामुळे खोटे बोल पण रेटून बोल हा भाजपाचा गुण त्यांना लागल्याने त्यांना सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाविषयी रातांधळेपणा आला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे त्यांना दिसत नाहीत. यातून ते शरद पवार यांचे आतापर्यंत त्यांना लाभलेले मार्गदर्शन शरद पवार यांनी त्यांना दिलेली संधी नाकारून भाजपा च्या संगतीत गेल्यामुळे त्यांची विचारांची खुजी झालेली मानसिकता ते लोक दर्शवत आहेत. परंतु आपण सर्व मतदार सुज्ञ आहात आपण सर्व जाणुन आहात. सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी सतत पाठपुरावा करून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून त्याद्वारे विकास कामे केलेली आहेत.
सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून मतदार संघासोबत राज्याच्या व्यापक हिताचे, महिला, बेरोजगार तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय आदी सर्व घटकांचे प्रश्न सभागृहात मांडून व जनहिताच्या आड येणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना विरोध करून बारामती लोकसभा मतदारसंघाचा आणि महाराष्ट्राचा आवाज सभागृहात बुलंद करण्याचे काम केले आहे. हा आवाज संसदेत असाच बुलंद ठेवण्यासाठी जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हासमोरील बटण दाबुन सुप्रिया सुळे यांना बहुमताने विजयी करण्याचे रोहिणी खडसे यांनी मतदारांना आवाहन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विभागीय अध्यक्ष भारती शेवाळे, खडकवासला विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष राजेश्वरी पाटील ,ग्रामिण च्या अध्यक्ष पुनम मते, नरहे गाव चे माजी सरपंच पोपटराव खेडेकर, कार्तिक जगताप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.