जळगाव (प्रतिनिधी) कृषी महामंडळ अथवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरीच्या 25 वर्षीय तरुणाची साडेतेरा लाखात फसवणूक झाली होती. याप्रकरणी ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अमरावतीस्थित कार्यालयातून अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त केले आहेत. एवढेच नव्हे तर मुक्ताईनगर पोलिसांनी दुध संघाकडूनही एकूण परीक्षार्थी आणि परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण उमेदवारांची माहिती मिळवली आहे.
मोठ्या प्रमाणात महत्वाचे दस्तऐवज जप्त !
सुरूवातीला एका संशयिताला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात अमरावतीच्या संशयिताला मुक्ताईनगर पोलिसांनी ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा संचालक सचिन वानखेडे (अमरावती) याला अटक केली होती. संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर वानखेडे याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. पोलीस कोठडीच्या काळात मुक्ताईनगर पोलिसांचे एक पथकाने अमरावती गाठत कंपनीच्या कार्यालयातून अनेक महत्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत.
जप्त दस्तऐवजाची होणार छाननी !
मुक्ताईनगर पोलिसांनी ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अमरावतीस्थित कार्यालयातून मोठ्या प्रमाणात कार्यालयातून महत्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. या दस्तऐवजमधून जळगाव दुध फेडरेशनमधील नौकरीसाठी घेण्यात आलेल्या दस्तऐवजाची होणार छाननी केली जाणार आहे. या दस्तऐवजमधून महत्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुध संघातूनही एकूण परीक्षार्थी आणि उत्तीर्ण उमेदवारांची माहिती पोलिसांनी घेतली !
मुक्ताईनगर पोलिसांनी परीक्षा घेणाऱ्या कार्यालयातून अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज जप्त करण्यासोबतच दुध संघातूनही परीक्षेशी संबंधित माहिती मागवून घेतली आहे. मुक्ताईनगर पोलिसांनी दुध संघाकडून परीक्षेत एकूण किती परीक्षार्थी होते?, तसेच एकूण किती विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले होते?, याची माहिती घेतली आहे. अमरावतीमधून जप्त केलेले दस्तऐवज आणि दुध संघाकडून मिळवलेले कागदपत्र यातून पोलीस चौकशीत नेमकी काय माहिती समोर आली?, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाहीय.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता !
दुध संघात नौकरी लावून देण्याच्या अमिषाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून याला रंग देखील मिळाला होता. तशात आता पोलिसांनी परीक्षा घेणारी कंपनीच्या कार्यालातून मोठ्या प्रमाणात दस्तऐवज जप्त केले आहेत. तसेच दुध संघाकडूनही काही कागदपत्र मिळवली आहेत. एवढेच नव्हे तर, परीक्षा घेणाऱ्या कंपनीचा संचालक सचिन वानखेडे (अमरावती), याच्या कडून पोलीस चौकशीतही महत्वाची माहिती मिळाली असल्याचे कळते. या प्रकरणात याआधी एका संशयितला अटक करण्यात आली होती तर अन्य एक फरार होता. आता अटकेतील संशयितांची संख्या दोनवर पोहचली आहे. दरम्यान, तपासात समोर आलेली माहिती लक्षात घेता भविष्यात या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण !
फकिरा अर्जुन सावकारे (25, भोकरी, ता.मुक्ताईनगर) येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी 12 वी नंतर फिटर कोर्स केलेला आहे. नोकरीच्या शोधात असतांना त्यांची प्रमोद शांताराम सावदेकर (रा.जळगाव) सोबत ओळख झाली होती. त्यावेळी प्रमोद सावदेकरने फकीरा सावकारे यांना सांगितले की, मी माझी राजकिय लोकांशी ओळख आहे व मी सध्या कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय, जळगाव येथे सहाय्यक व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. तुमचे नोकरीचे काम करायचे असल्यास तुम्हाला मी जळगाव कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय या विभागात सहाय्यक व्यावस्थापक या पदावर किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये टेक्निशियन फिटर या पदावर नोकरीला लावुन देतो असे आमिष दाखविले. त्यानंतर शेख जावेद शेख रहीम या मित्रासमोर 5 ऑगस्ट 2021 रोजी सावदेकर यांना 5 लाख रोख दिले.
मी पेपरचे पाहुन घेईल !
त्यानंतर काही कालावधीनंतर सावदेकर यांनी दुध फेडरेशन जळगाव येथे जागा निघाल्या असुन तेथे फॉर्म भरुन दे, मी पेपरचे पाहुन घेईल, असे फकीरा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी जळगाव दुध फेडरेशन येथे पेपर दिला व परीक्षेत पास झाले. यानंतर कन्फर्म ऑर्डर काढण्यासाठी आणखी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर सावदेकर यांना पुन्हा 12 डिसेंबर 2021 रोजी कृषी उद्योग विकास महामंडळ विभागीय कार्यालय, जळगाव येथे पाच लाख रुपये देण्यात आले. यावेळी सावदेकर म्हणाले की, आता तुझी मुलाखत व कागदपत्रे पडताळणी होईल त्यासाठी तुला परत साडेतीन लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर मार्च 2022 महिन्यात त्यांना पुन्हा साडेतीन लाख दिलेत. परंतू पैसे घेऊन ऑर्डरसाठी फकीरा यांनी विचारणा केली असता सावदेकर यांनी ते उडवा उडवीचे उत्तरे द्यायला लागले. त्यानंतर सावदेकर यांनी फकीरा यांना दोन लाख रुपये किंमतीचा जे.डी.सी.सी.बँकेचा चेक दिला होता परंतू तो चेक तो बाउन्स झाला यानंतर मा, फकिरा सावकारे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सावदेकरकडून राजकीय हिससंबंध असल्याची बतावणी !
प्रमोद सावदेकर यांनी त्यांचे राजकीय हिससंबंध चांगले असल्याचा विश्वास देत आपली 13 लाख 50 हजार रोख घेवुन नोकरी न लावता फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात भादवी 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, वानखेडेच्या अटकेनंतर परीक्षेत नेमका कसा घोळ करण्यात आला होता?,यात कोणकोण सहभागी होते?, याची माहिती पोलीस चौकशीत समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















