जळगाव (प्रतिनिधी) जुन्या वादातून समता नगरातील तरुणाचा रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉपरने वार करून गळा चिरुन निर्घृण खून करण्यात आला. अरुण बळीराम सोनवणे (वय २८,रा. समता नगर), असे मृताचे नाव आहे. या हल्ल्यात त्याचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणावर वार केल्यानंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
नेमकं काय घडलं !
शहरातील समता नगरात अरुण सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. त्याचे परिसरातील काही तरुणांसोबत गेल्या अनेक दिवसांपासून भांडण सुरु होते. तसेच अरुणच्या भावाचे त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणासोबत वाद झाला होता. त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी अरुण त्याचा चुलत भाऊ आशिष सोनवणेला सोबत घेवून वंजारी टेकडीजवळील नवनाथ मंदिराजवळ गेले. याठिकाणी मारेकऱ्यांसोबत अरुण यांचा शाब्दिक वाद होवून त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी मारेकऱ्यांनी संतापाच्याभरात त्यांच्याजवळ असलेल्या चॉपरसारख्या धारदार शस्त्राने अरुण व आशिष सोनवणे यांच्यावर सपासप वार करीत त्यांना गंभीर जखमी करीत तेथून पसार झाले.
मित्रांसह नातेवाईकांचा आक्रोश !
टोळक्याच्या हल्ल्यात अरुणचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी आक्रोश करीत अरुणला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांसह मित्रांनी संताप व्यक्त करीत प्रचंड आक्रोश केला. जिल्हा रुग्णालयासह समता नगर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी समता नगर परिसरात पोलिस बंदोबस्तासह क्युआरटी पथक तैनात केले आहे.
दोन आठवड्यांवर आले होते लग्न !
अरुण सपकाळे याचे २५ डिसेंबर रोजी लग्न होणार होते. त्यामुळे घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, त्यापूर्वीच वाद उफाळला व त्याला जीव गमवावा लागला.
भावी पत्नीला अश्रू अनावर !
मयत अरुण सोनवणे याचा दि. २६ नोव्हेंबर रोजी साखरपुडा होवून दि. २५ डिसेंबर रोजी त्याचे लग्न होणार होते. त्याच्या कुटुंबियांसह घरात लग्नाची तयारी सुरु होती. परंतू त्यापुर्वीच त्यांच्यातील जूना वाद उफळून अरुणला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, अरुणचा ज्या तरुणीसोबत विवाह होणार होता. त्याच्या होणाऱ्या पत्नीला घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती देखील जिल्हा रुग्णालयात आली होती. यावेळी तरुणीने आक्रोश करीत अश्रृंना वाट मोकळी करुन दिली.
संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना !
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह रामानंद नगर व एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेबद्दल माहिती जाणून घेत संशयित मारेकऱ्यांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहे.
भावाला वाचविण्यासाठी गेलेल्यावर हल्ला !
वाद मिटविण्यासाठी अरुण हा वंजारी टेकडीवर गेला असल्याचे कळताच त्याचा मोठा भाऊ गोकुळ हा देखील तेथे पोहचला. यावेळी आपल्या दोघ भावांवर टोळक्याकडून वार होत असल्याचे दिसताच त्याने वार अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावर देखील मारेकऱ्यांनी हल्ला केला. यामध्ये आशिष संजय सोनवणे व गोकुळ बळीराम सोनवणे हे दोघ गंभीर जखमी झाले.
टोळक्याने केले धारदार शस्त्राने वार !
पाच ते सहा जणांकडून धारदार शस्त्राने वार झाल्यामुळे अरुण सोनवणे हा गंभीर जखमी झाला. यावेळी त्याच्या गळा चिरला गेला होता तर डोक्यावर, चेहऱ्यावर आणि पोटावर देखील ठिकठिकाणी भोसकले होते. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अरुणचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा व चॉपरचे कव्हर पडलेले होते. पोलिसांनी ते हस्तगत केले आहे.
मयताची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता !
चार वर्षांपूर्वी एम. जे. कॉलेजमधील पार्कीगमध्ये तरुणाचा खून झाला होता. यामध्ये अरुण सोनवणे हा संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. परंतू काही महिन्यानंतर तो जामीनावर सुटला होता. या गुन्ह्याचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाने अरुण सोनवणे याला निर्दोष मुक्त केले होते.