जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. अगदी मृत्यू, लग्न समारंभ असला तरी मोजक्या लोकांना उपस्थित राहता येते. मग राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेरला ५०० पेक्षा अधिक लोकं एका कार्यक्रमाला कशी एकत्र जमली?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोशल मिडीयात याबाबत काहींनी मिम्स बनविले आहेत. तर नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहेत का? नेते अपवाद असतात का?, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनावरील राज्यव्यापी बैठक घेत आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावली होती. त्यानुसार राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरुपाचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यातून काही सवलत देण्यात आली. परंतू सार्वजनिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी कायम आहे. दुसरीकडे मात्र, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशन संचलीत ग्लोबल महाराष्ट्र या सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जामनेरात मंगळवारी आले होते. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा हॉल भरगच्च भरलेला होता. कार्यक्रमावेळी फिजिकल डिस्टंन्सींगचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पार फज्जा उडाल्याचे चित्र होते. शिवाय अनेक जण ‘मास्क’ न घालता वावरत असल्याचे चित्र होते. अशा गर्दीत एखादा जरी व्यक्ती कोरोनाबाधित असला तर आरोग्य यंत्रणेसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, नियमाचे उल्लंघन केल्यास सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातात. दुकाने सील केली जातात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सतत फिजिकल डिस्टंन्सींगचे पालन करण्याचे अवाहन केले जाते. ‘कोरोना’चा प्रकोप सुरूच असल्यामुळे सर्वांनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करावे व तसेच ‘मास्क’ घालावेत अशा सूचना वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून देण्यात येत आहेत. खुद्द राजकीय पक्षांचे नेतेदेखील यासंदर्भात सूचना करताना दिसून येतात. मात्र आंदोलन, बैठका किंवा कार्यक्रमादरम्यान मात्र त्याचा विसर पडत आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होतात किंवा दंड आकारण्यात येतो. आता जळगाव जिल्हा प्रशासन जामनेरच्या कार्यक्रमाबाबत नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.