धरणगाव (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने गुरुवारी शहरातील कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त केला होता. या धान्यसाठ्याची थोड्यावेळापूर्वी पुरवठा आणि आयजींच्या पथकाने संयुक्त पाहणी सुरु केल्याचे कळतेय. या पाहणीनंतर पुरवठा विभागाला काही संशयास्पद वाटल्यास धान्याचे नमुने घेतले जाणार असल्याचे कळतेय.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला गुरुवारी दुपारी शहरातील कमल जिनिंगमध्ये धाड टाकत धान्यसाठा जप्त केला होता. त्यानंतर सायंकाळी याबाबत धरणगाव तहसीलदार यांना कारवाईबाबतची माहिती देण्यात आली. तसेच याविरुद्ध योग्य कारवाई करण्याचे सांगण्यात आले. तसेच आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास पुरवठा विभागाने पोलिसांसोबत संयुक्त पाहणी करण्याचे सांगण्यात आले होते. परंतू नाशिकचे पथक सायंकाळी पोहचल्यामुळे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिवसभर ताटकळत बसावे लागले. त्यानंतर थोड्यावेळापूर्वी पाहणी सुरु करायला सुरुवात करण्यात आली आहे. या पाहणीनंतर पुरवठा अधिकारी संजय घुले हे आपला अभिप्राय देणार आहेत.
दरम्यान, जप्त साठ्यातील धान्याचे सॅपल घेऊन नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच हा धान्यसाठा रेशनचा आहे की, खाजगी हे स्पष्ट होऊ शकणार असल्याची प्रतिक्रिया तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे परवाना धारक व्यापाऱ्याला आपण जिनिंग भाड्याने दिलीय. त्यामुळे तिथं कुठलाही अवैध धान्यसाठा असण्याचा प्रश्नच येत नाहीय, अशी प्रतिक्रिया कमल जिनिंगचे मालक दिलीप महाले यांनी दिली होती. त्यामुळे यामुळे आता प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून पुढे काय?, असा प्रश्न निर्माण झालाय.