जळगाव (प्रतिनिधी) फुगे विक्री करणाऱ्या महिलेच्या 4 वर्षाच्या मुलाला पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फुगे विक्रेत्या महिलेने सासुसोबत जागेवरून असलेल्या वादातुन मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दिली आहे.
शबाना सलमान चव्हाण (वय 26, रा. लक्ष्मीनगर, काेपरगाव, जिल्हा नगर) ही महिला फुगे विक्री करून आपला उदरनिर्वाह करते. तिचा पती सलमान खान शिवराम चव्हाण हा पाच महिन्यापासून एका गुन्ह्यात नाशिक येथील कारागृहात आहे. ती दाेन महिन्यांपासून जळगाव येथील रेल्वेस्थानकाच्या बुकिंग हाॅलमध्ये राहतेय. तिच्या साेबत सासु अलका शिवराम चव्हाण, आई सतिका रयदुल काळे, बहिण, मुलगा आयुष (वय 4) व लगुनी (वय 2 महिने) यांच्या साेबत राहते. तिचा नातेवाई असलेला राहुल दामु भाेसले हा सुद्धा त्याची पत्नी रेशमा व दाेन मुलं आणि एक मुलीसाेबत राहतो.
शबाना ही साेमवारी 4 वाजेच्या सुमारात शहरातील महापालिकेच्या 17 मजली इमारतील शेजारी खाऊ गल्लीत फुगे विक्री करीत होती. त्यावेळी तिचा चार वर्षाचा मुलगा आयुष राहुल भाेसले याच्या तिन्ही मुलांसाेबत बाजुला खेळत हाेता. थाेड्या वेळाने आयुष साेबत खेळणारे तिन्ही मुलं परत आपापल्या आईकडे आली. परंतु, आयुष आला नाही. त्यानंतर राहुल व शबाना यांनी आयुषाचा शाेध घेतला परंतु ताे तिथे नव्हता. दरम्यान, शबाना हिचा नातेवाईक असलेल्या नितीन लाल भाेसले (रा. काेकण, ठाणे) याचा शबानाची सासु अलका चव्हाण यांच्यासाेबत जागेवरून वाद आहे. ताे दाेन- तीन दिवसांपासून काही लाेकांसाेबत जळगावात आला हाेता. त्यानेच मुलगा आयुष याला पळवुन नेल्याची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी नितीन लाला भाेसलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.