जळगाव (प्रतिनिधी) शहरात गुन्हेगारी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. या एरियाचा दादा मीच आहे…असे म्हणत तिघांनी दोन तरुणांवर चाकू हल्ला करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुक्ताबाई एकनाथ जोशी ( रा.नाथवाडा,कालभैरव मंदिराजवळ ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ ऑक्टोंबर रोजी गल्लीतील जोगेश्वर दुर्गादेवी मित्र मंडळाजवळ त्या आणि त्यांचा मुलगा हिरामण एकनाथ जोशी (रिक्षा चालक) तसेच परिसरातील गणेश सोनार, मधूकर सोनार, उषाबाई सोनार व काही महिला उभ्या होत्या.
तेव्हा रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास विशाल दत्त सोनवणे, हा त्याचे मित्र साहिल अकबर तडवी, पिंट्या तडवी (सर्व रा. नाथवाडा) सोबत मंडळाजवळ आला आणि त्यानंतर थेट हिरामणची कॉलर धरून तू स्वत:ला या एरियाचा दादा समजतोस का?..,या एरियाचा मी दादा आहे, असे म्हणत मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी साहिल व पिंट्या यांनी देखील मारहाण केली. यावेळी गणेश सोनार हा त्यास वाचविण्यासाठी धावला. मात्र, त्यालाही तिघांनी मारहाण केली. नंतर विशाल याने गणेशच्या हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुक्ताबाई यांच्या हाताला सुध्दा विशाल याने चावा घेतला व नंतर बंदूकीने गोळ्या झाडून मारूण टाकण्याची धमकी दिली.या प्रकरणी मुक्ताबाई जोशी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणा-या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पोलीस स्थानकात तक्रार द्यायला येत असतानाही धमकी आरोपींनी धमकी दिल्याचे मुक्ताबाई यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.