राजकोट (वृत्तसंस्था) गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील एका कोव्हीड हॉस्पिटलमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर आग लागली. या घटनेत पाच कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला तर एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयाच्या आयसीयू कक्षामध्ये आग भडकली. या कक्षात ११ रुग्ण उपचार घेत होते. कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील प्रत्येक राज्यांमध्ये कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालये कार्यरत असून, गुजरातमधील राजकोटमधील शिवानंद रुग्णालय कोविड रुग्णालये म्हणून सुरू आहे. या रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. रुग्णालयातील आयसीयू कक्षात सर्वात आधी आगीचा भडका उडाला. आग लागली त्यावेळी आयसीयू कक्षात ११ रुग्ण उपचार घेत होते. यापैकी पाच जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळानं आग नियंत्रणात आणण्यात यश आलं. या आगीत अनेक रुग्ण होरपळे आहेत.
आगीत जखमी झालेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचबरोबर शिवानंद रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.